मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तब्येतीची माहिती मिळताच राज ठाकरे सातत्याने संपर्कात होते, अशी माहिती राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी दिली.
संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी झालेल्या गंभीर आजारानंतर डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता. प्रकृती सुधारत असल्याचे संकेत जरी मिळत असले, तरी “लोकांमध्ये जाऊ नकोस… दीड-दोन महिने आराम कर” असा प्रेमळ दम राज ठाकरेंनी दिल्याचे सुनील राऊत यांनी सांगितले.
सुनील राऊत म्हणाले, “राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनी आमच्या घरी आले. ते सतत संजयच्या प्रकृतीविषयी विचारपूस करत होते. अमेरिकेत उपचाराची गरज आहे का, यावरही राज ठाकरे गंभीरपणे चर्चा करत होते.” दोघांमध्ये जवळपास २५ ते ३० मिनिटांची चर्चा झाली. संजय राऊतांच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर कशी काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबाबतही राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज ठाकरे यांनी भांडूप परिसरातील पूर्वीच्या भेटींची आठवणही काढली. “मी आधी घरी आलो होतो तेव्हा रस्त्यांची स्थिती वेगळी होती,” अशी त्यांनी केलेली टिप्पणीही सुनील राऊत यांनी सांगितली.
यापूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही संजय राऊत यांची भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली होती. राऊत लवकरच पुन्हा सक्रिय होतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला होता. सध्या विश्रांती घेत असतानाही संजय राऊत सोशल मीडियातून राजकीय घडामोडींवर भाष्य करत आहेत.


