पुणे प्रतिनिधी
पतीकडेच वैवाहिक शारीरिक संबंधाची मागणी केल्याचा राग आल्याने पुण्यात एका २९ वर्षांच्या विवाहितेवर पतीनेच अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने नवविवाहितेच्या प्रायव्हेट पार्टसह मांड्यांवर सिगारेटचे चटके दिल्याचा भयानक प्रकार समोर आला असून याबाबत पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे लग्न ११ एप्रिल २०२५ रोजी मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे झाले. विवाहानंतर पहिल्या दिवसापासूनच पती तिच्यापासून जाणूनबुजून दूर राहत होता. हनिमून नाईटपासून तब्बल दोन महिने विवाहितेला पतीकडून कोणताही शारीरिक प्रतिसाद मिळाला नाही. महिलेने पुढाकार घेतला तरी आरोपी पती घराबाहेर जाऊन बाहेर झोपत असे.
सासरच्यांकडे तक्रार, धमकीच मिळाली
पीडितेने हा प्रकार सासरच्यांना सांगितल्यावर मदतीऐवजी “हे घरातील प्रकरण, बाहेर कुणाला सांगू नको” अशी धमकी तिला मिळाल्याचे तक्रारीत नमूद आहे. महिलेने पुन्हा तक्रार करताच पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ सुरू झाल्याचेही सांगण्यात आले.
“चल तुला आत दाखवतो” म्हणत बेडरूममध्ये मारहाण
फिर्यादीच्या मते, तिने डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत पतीला सांगितल्यावर त्याने संतापून “चल तुला आत दाखवतो” असे म्हणत तिला बेडरूममध्ये नेले. तेथे तिच्या प्रायव्हेट पार्ट व मांड्यांवर सिगारेटचे चटके देऊन मारहाण करण्यात आली. या अत्याचारादरम्यान नणंद व इतर सासरचे लोक उपस्थित होते, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
मानसिक छळ, पैशांची मागणी आणि धमक्या
पतीच्या शारीरिक असमर्थतेबद्दल सासरच्यांकडे बोलल्यावर तिच्या माहेरी जाण्यावरही नणंद व इतरांनी प्रतिबंध केला. जिमसाठी ६० हजार रुपये आणण्यास भाग पाडल्याचा आरोपही तिने केला. कलवड वस्ती येथे राहायला गेल्यावर चुलत सासरे तिच्याकडे “वाईट नजरेने पाहत” असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
त्याला विरोध केल्यावर पुन्हा मारहाण व शिवीगाळ करण्यात आल्याचेही पीडितेचे म्हणणे आहे. छळ असह्य झाल्यावर तिने हात कापून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांत बैठक झाली. तेव्हा पतीने स्वतः शारीरिकदृष्ट्या असमर्थ असल्याची कबुली दिल्याचेही समोर आले.
पाच जणांविरोधात गुन्हा
घटनेनंतर विवाहित महिला माहेरी राहत असून पती (३३), सासू (५६), नणंद (२५), चुलत नणंद (२७) आणि चुलत सासरे (६०) यांच्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ११ एप्रिल ते १५ जून २०२५ दरम्यान घडल्याचे पोलिसांनी सांगितले.


