मुंबई प्रतिनिधी
सायन पूर्व–पश्चिम भागांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीला गती देत मे २०२६ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य महापालिकेकडून निश्चित करण्यात आले आहे. पुलासाठी लागणाऱ्या तुळयांचे उत्पादन नागपूर आणि अंबाला येथील प्रकल्पांमध्ये वेगाने सुरू असून या दोन्ही ठिकाणी महानगरपालिकेचे प्रतिनिधी पूर्णवेळ देखरेखीसाठी तैनात राहणार आहेत.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर आणि पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी मंगळवारी घेतलेल्या आढावा बैठकीत कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत बांगर यांनी ३१ मे २०२६ ही कठोर अंतिम मुदत देत कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला.
आढावा बैठकीस महापालिकेचे उपआयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, प्रमुख अभियंता उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता राजेश मुळ्ये तसेच मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता (निर्माण) रोहित मेहला यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. कामांची सद्यस्थिती, उर्वरित टप्पे व त्यांची कालमर्यादा यांवर चर्चा करत प्रकल्पाचा रोडमॅप निश्चित करण्यात आला.
कामांना गती, समन्वयावर भर
उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीला अपेक्षित गती मिळत असल्याचे सांगत बांगर यांनी रेल्वे प्रशासनासोबत अचूक समन्वय राखण्याचे आदेश दिले. नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी प्रभावी सहकार्य ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ठराविक कालमर्यादा पाळण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
कामांची वेळापत्रक, महत्वाचे टप्पे
एलबीएस मार्गावरील पादचारी भुयारी मार्गाचे काम : डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण
धारावी बाजूचा पादचारी भुयारी मार्ग : फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत
रेल्वे पुलावरील तुळयांचे काम :
• उत्तर बाजू – मार्च २०२६ चा पहिला आठवडा
• दक्षिण बाजू – एप्रिल २०२६ चा पहिला आठवडा
धारावी व एलबीएसकडील पोहोच रस्ते : १५ एप्रिल २०२६ पर्यंत
पूर्वेकडील पोहोच रस्ता : १५ एप्रिलनंतर सुरू, ४५ दिवसांचा कालावधी
याप्रमाणे सर्व कामे नियोजनबद्ध रितीने पार पडल्यास ३१ मे २०२६ पर्यंत उड्डाणपुल पूर्णपणे तयार होईल आणि १ जून २०२६ पासून वाहन वाहतुकीसाठी खुला करण्याची शक्यता असल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले.
पुलासाठी लागणाऱ्या तुळया वेळेवर उपलब्ध होणे हा संपूर्ण प्रकल्पातील निर्णायक घटक असून त्यासाठी महापालिकेचे अधिकारी थेट उत्पादन केंद्रांवर उपस्थित राहून कामांची निगरानी करणार आहेत.
सायन-शीव परिसरातील वाहतुकीसाठी जीवनवाहिनी ठरणाऱ्या या उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीमुळे परिसरातील रहदारीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.


