मुंबई प्रतिनिधी
मुंबई आणि उपनगरातील लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक घडामोड. मध्य रेल्वेने परळ, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि पनवेल या चार महत्त्वाच्या स्थानकांवर तब्बल २० नवे प्लॅटफॉर्म उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या विकासकामांमुळे मुंबई लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान व सुकर होणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार पुढीलप्रमाणे प्लॅटफॉर्म्स उभारले जाणार आहेत
परळ : ५ प्लॅटफॉर्म
• कल्याण : ६ प्लॅटफॉर्म
• LTT : ४ प्लॅटफॉर्म
• पनवेल : ५ प्लॅटफॉर्म
एकूण — २० नवे प्लॅटफॉर्म्स
मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि लोकल प्रवाशांच्या वाढत्या ताणाचा विचार करून प्लॅटफॉर्म विस्ताराची ही महत्त्वाकांक्षी योजना तयार करण्यात आली आहे. सध्या १५ डब्यांच्या लोकलसाठी सुरू असलेल्या विस्तारकामांना या नव्या प्लॅटफॉर्म्सची मोठी साथ मिळणार आहे.
प्रवाशांसाठी काय बदलणार?
• लांब पल्ल्याच्या गाड्यांची गर्दी कमी होणार
• दादर आणि सीएसएमटीवरील ताण मोठ्या प्रमाणात हलका
• लोकल फेऱ्या वाढवणे शक्य
मुंबई–पनवेल–कोकण मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत
परळ : नवा टर्मिनस आकारास
रेल्वे अर्थसंकल्प २०२५मध्ये परळला नवा टर्मिनस म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव होता. आता या कामाला गती मिळाली असून, अमृत भारत स्टेशन प्रकल्पांतर्गत परळचे आधुनिकीकरण सुरू आहे. नव्या पाचवा आणि सहावा मार्गावर केवळ मेल/एक्सप्रेस गाड्या धावणार असून, यामुळे दादर आणि सीएसएमटीवरील भार लक्षणीय घटेल.
पनवेल : उदयोन्मुख ‘मेगा इंटरचेंज हब’
नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स-हार्बर लिंक आणि मेट्रो नेटवर्कच्या पार्श्वभूमीवर पनवेलचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे. येथील पाच नवे प्लॅटफॉर्म..
कोकणकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवतील
• पनवेलला ‘मेगा इंटरचेंज हब’ बनवतील
• मुंबई–नवी मुंबई–पुणे कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान करतील
• LTT आणि कल्याण : वाढीव क्षमतेचा लाभ
LTTवर उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांसाठी चार नवे प्लॅटफॉर्म उभारले जात आहेत. तर कल्याण स्थानकावरील सहा नवीन प्लॅटफॉर्ममुळे लोकल तसेच मेल–एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांची संख्या वाढविणे शक्य होणार आहे.
मध्य रेल्वेचा हा निर्णय मुंबईच्या रेल्वे नेटवर्कसाठी ‘गेम-चेंजर’ ठरणार आहे. पुढील काही वर्षांत मुंबईतील रेल्वे सुविधा अधिक आधुनिक, विस्तृत आणि सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


