मुंबई प्रतिनिधी
राज्यातील नगरपालिका व नगरपंचायती निवडणुकांवर सुरू झालेल्या वादळाला संपता संपत नाही. २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व निकाल २१ डिसेंबरपर्यंत जाहीर न करण्याचे आदेश दिल्याने उमेदवारांसह सामान्य मतदारांच्याही प्रतीक्षेत वाढ झाली आहे.
दरम्यान, ठाकरे गटाच्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी “निवडणूक आयोग आणि न्यायालय यावर न बोलेलंच चांगलं” एवढ्याच एका वाक्यात खोचक प्रतिक्रिया दिली.
“धुळफेक करणारे कट्टर शिवसैनिक परत येतात”
मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाची मशाल हाती घेतली. शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत करताना उद्धव ठाकरे म्हणाले,
“पक्षातून दूर गेलेले, धुळफेक केलेले कट्टर शिवसैनिक पुन्हा परतत आहेत, ही समाधानाची बाब आहे.”
यावेळी त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधत राजकारणातील वाढत्या ‘प्रदूषणाचा’ उल्लेख केला.
“हवेत जसं प्रदूषण आहे, तसंच आज राजकारणातही आहे. दगाबाज भाजपला धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली. सत्तेसाठी सगळी लाचारी सुरू आहे,” असे ते म्हणाले.
ठाकरे यांनी ठाण्यातील राजकीय समीकरणांवर बोलताना टीकास्त्र सोडले.
“मला शिव्या घालणारे आज सोनिया गांधींसोबत फोटो काढत आहेत. ठाण्यात अजित पवार निधी देत नाही म्हणून लोकं नाराजी व्यक्त करतात,” असे त्यांनी म्हटले.
“भगवा पवित्र; त्यावर कोणतेही चित्र नको”
ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भगव्याच्या सन्मानाचे भान ठेवण्याचा सल्ला दिला.
“ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. भगव्या ध्वजावर कोणतंही चित्र छापू नका; तो शिवरायांचा, पवित्र ध्वज आहे. मशाल हीच दिशा दाखवेल, तिच्या तेजात सगळी मैल धुऊन जाईल,” असे ते म्हणाले.
राज्यातील स्थगित निकाल, बदलतं राजकीय गणित आणि ठाकरे गटातील वाढता पक्षप्रवेश, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची ही भूमिका राजकीय चर्चांना नवी दिशा देणारी ठरत आहे.


