
सातारा प्रतिनिधी
सातारा येथील काळूबाईच्या नावाने चांगभलं’च्या जयघोषात मांढरदेव येथील यात्रेला सुरुवात झाली. कडाक्याच्या थंडीत मांढरगडावर मोठ्या संख्येने भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे. मंदिर आणि परिसर आकर्षक फुलांनी आणि रोषणाईने सजविण्यात आला आहे. वातावरण उत्सवाचे निर्माण झाले आहे.
. छबिन्यानंतर आज पहाटे पालखी देवीच्या मंदिराजवळ आली. मंदिरालगतच्या पारावर पालखी आल्यानंतर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. एस टी बस, आराम बस, ट्रक, टेम्पो, मोटार, दुचाकीवरून हजारो भाविक यात्रा परिसरात पोहोचले होते. मुखवटे घातलेल्या असंख्य महिला भाविकांनी गर्दी केली होती. पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील मानाची काठी टाळ-मृदंगाच्या गजरात दुपारी मांढरदेवी येथे पोहोचली. सातारा प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. यात्रेपूर्वीच जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनीही यात्रेचा आढावा घेतला.