मुंबई प्रतिनिधी
कुर्ला पश्चिम परिसरात वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली एका तरुणाला अंडी, दगड फेकून अखेर पेट्रोल शिंपडत पेटवून देण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजमधून या अमानुष कृत्याचे चटकेदार दृश्य समोर आले असून परिसरात खळबळ माजली आहे.
मुंबईत वाढदिवसाचं सेलेब्रेशन करताना ५ मित्रांनीच
२१ वर्षीय मित्राला पेट्रोल ओतून जाळल्याची धक्कादायक घटना#Mumbai #birthday pic.twitter.com/5vd3IHuCxM— Namdeo kumbhar (@kumbharnc57) November 26, 2025
घटनेत अब्दुल रहमान (२१) हा युवक गंभीर भाजला असून सध्या रुग्णालयात उपचाराधीन आहे. विनोबा भावे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे.
वाढदिवसाचे सेलिब्रेशन की निर्घृण हल्ला?
कोहिनूर सिटी येथील इमारतीत राहणाऱ्या अब्दुल रहमानचा सोमवारी (२५ नोव्हेंबर) वाढदिवस होता. रात्री बारा वाजताच्या सुमारास त्याचे पाच मित्र, अयाज़ मलिक, अशरफ़ मलिक, कासिम चौधरी, हुज़ैफ़ा खान आणि शरीफ़ शेख, यांनी त्याला खाली बोलावून वाढदिवस साजरा करण्याचा बहाणा केला.
अब्दुलच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला केक कापण्यात आला. त्यानंतर ‘मस्करीच्या’ नावाखाली मित्रांनी त्याच्यावर अंडी आणि दगड फेकण्यास सुरुवात केली. मात्र काही क्षणांत ही मस्करी भयावह वळण घेईल, याची अब्दुलला कल्पनाही नव्हती.
स्कूटीवरून आणलेला ज्वलनशील पदार्थ… आणि पेटवून दिला मित्रालाच!
आरोपींपैकी एकाने स्कूटीवरून आणलेल्या बाटलीतील ज्वलनशील पदार्थ अब्दुलच्या अंगावर फेकला आणि क्षणार्धात त्याला पेटवून दिले. अचानक लागलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी अब्दुलने स्वतःचे कपडे काढत कसेबसे जीव वाचवला. तरीही तो गंभीर जखमी झाला.
तातडीने त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.
पोलिसांची झटपट कारवाई; आरोपी कोठडीत
अब्दुल रहमानने दिलेल्या तक्रारीनंतर विनोबा भावे पोलिसांनी पाचही मित्रांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११० (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) आणि कलम ३ (५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कोर्टाने २९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कटकारस्थान की मस्करीचा अतिरेक?
पोलिस या घटनेचा विविध अंगांनी तपास करत आहेत. आरोपींनी वापरलेला ज्वलनशील पदार्थ नेमका कोणता होता, तो कुठून आणला, आणि ही घटना केवळ मस्करीतून घडली की यामागे काही वैराचे कारण होते, याचा तपास सुरू आहे.
या अमानुष प्रकारामुळे कोहिनूर सिटी परिसरात तणावाचे वातावरण असून नागरिकांमध्येही संतापाची भावना पसरली आहे. वाढदिवसाच्या नावाखाली मित्रच मित्राचा जीव घेण्याच्या पातळीवर पोहोचतात, ही बाब हादरवून टाकणारी आहे.


