मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांसाठी सकाळ-संध्याकाळची लोकल म्हणजे श्वास गुदमरवणारी धावपळ. ठासून भरलेले डबे, जीवावर उदार होऊन चढ-उतार करणारे प्रवासी आणि दररोजची तीच धक्काबुक्की. प्रवाशांची वाढती संख्या आणि त्याला पुरेशी सुविधा नसल्याने मध्य रेल्वेवर परिस्थिती गेल्या काही वर्षांत अधिकच बिकट झाली होती. अखेर या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
आता मध्य रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या तब्बल २४० लोकल फेऱ्या धावणार असून गर्दीतून होणारा नागरिकांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रोजंदारीत धक्काबुक्की, त्यावर ‘३ डब्यांचा’ उतारा
सध्या मध्य रेल्वेच्या मार्गावर एकूण १,८१० लोकल फेऱ्या धावतात; त्यापैकी फक्त २२ फेऱ्या या १५ डब्यांच्या आहेत. प्रवासीवाहतूक मात्र दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. १२ डब्यांच्या लोकलमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी कोंबले जात असल्याने सकाळ-संध्याकाळची गर्दी असह्य झाली आहे.
१५ डबा लोकलमुळे सुमारे २५ टक्के अधिक क्षमता उपलब्ध होणार असून प्रत्येक फेरीत ६०० ते ८०० प्रवासी अतिरिक्त सामावू शकतील. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ परिसरातील लाखो प्रवाशांना सुटकेचा श्वास मिळणार आहे.
रखडलेला प्रकल्प अखेर रुळावर
२०१२ मध्ये मध्य रेल्वेवर पहिली १५ डब्यांची लोकल धावल्यानंतर पुढील विस्ताराला अडथळ्यांचे जाळे होते
” अपुरी फलाट लांबी
• सिग्नल यंत्रणेची मर्यादा
• पिट लाइन व स्टॅबलिंग लाइनची कमतरता
• दुरुस्ती-देखभालीसाठी अपुरा तांत्रिक पायाभूत आधार
या सर्वांमुळे १५ डबा प्रकल्प कागदावरच राहिला. मात्र आता मध्य रेल्वेने या कामांना गती दिली असून बहुतेक कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
६० किमी परिसरातील ३४ स्थानकांमध्ये मोठा बदल
३५० मीटर लांबीच्या १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाट विस्ताराचे महाकाम युद्धपातळीवर सुरू आहे.
शहाड, आंबिवली, टिटवाळा, वाशिंद, आसनगाव, आटगाव, तानशेत, कसारा, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शेलू, भिवपुरी, कर्जत, खोपोली, पळसदरी, मुंब्रा, कोपर, कळवा, ठाकुर्ली यांसह ३४ स्थानकांचा विस्तार सुरू असून त्यापैकी २७ स्थानकांचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे.
सीएसएमटी–कल्याणनंतर आता कर्जत–कसाऱ्यापर्यंत भरारी
सध्या १५ डब्यांच्या लोकल मुख्यत्वे सीएसएमटी–डोंबिवली–कल्याण विभागात धावत आहेत. पायाभूत सुविधेच्या अभावामुळे कल्याण–कर्जत व कल्याण–कसारा मार्गांवर या लोकल वाढवता येत नव्हत्या. आता या दोन्ही मार्गांवरील विस्तारकामांना वेग आला असून पुढील काही महिन्यांत या दिशेला १५ डबा लोकलची संख्या लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
२० रेक्स, २४० फेऱ्या – मोठा टप्पा
पहिल्या टप्प्यात १० लोकल रेक १२ वरून १५ डब्यांमध्ये रुपांतरित केले जात आहेत.
दुसऱ्या टप्प्यात आणखी १० रेक १५ डब्यांमध्ये बदलण्यात येणार आहेत.
या २० लोकल रेकमुळे २४० लोकल फेऱ्या मध्य रेल्वेवर धावतील.
सीएसएमटी आणि कल्याण स्थानकांवर १५ डबा लोकल उभी करण्यासाठी अतिरिक्त जागा तयार केली जात आहे. तसंच वांगणी व भिवपुरी येथेही स्टॅबलिंग लाइनच्या सुविधा उभारल्या जात आहेत.
“गर्दी कमी करणे हेच ध्येय” – मध्य रेल्वे
या संपूर्ण प्रकल्पाबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला म्हणाले..
“पहिल्या टप्प्यात १० आणि पुढील टप्प्यात आणखी १० लोकल रेकचे १५ डब्यांमध्ये रुपांतर होणार आहे. सीएसएमटी, कल्याणसह काही मार्गिकांवर लोकल उभ्या करण्याची क्षमता वाढवली जात आहे. प्रवासीभार लक्षात घेता १५ डबा लोकल फेऱ्या वाढवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.”
मुंबईकरांसाठी मोठा दिलासा
दररोज ३०–४० लाख प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मध्य रेल्वेला १५ डबा लोकल हेच सर्वात सक्षम उत्तर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पायाभूत सोयींतील वाढ, विस्तारीत फलाट आणि तांत्रिक क्षमता पूर्ण झाल्यानंतर येत्या काही महिन्यांत मध्य रेल्वेवर ‘१५ डबा युग’ सुरू होण्याची चिन्हे आता स्पष्ट दिसत आहेत.


