उमेश गायगवळे, मुंबई
महाराष्ट्र स्वतःला प्रगत, सुशिक्षित, सुसंस्कृत राज्य म्हणून मिरवतो. स्त्री-शिक्षणाचा वारसा, सावित्रीबाईंची परंपरा, महिलांना दिलेले ५० टक्के आरक्षण, हे सर्व जणू उज्ज्वल चित्र रंगवतात. परंतु या चमकदार चित्राच्या पाठीमागे एक खोल, अंधकारमय सत्य उभं राहतंय. गेल्या काही महिन्यांत तीन तरुण, उच्चशिक्षित, स्वावलंबी महिलांनी,वैष्णवी हगवणे (पुणे), डॉ. संपदा मुंडे (सातारा) आणि आता डॉ. गौरी पालवे (मुंबई).स्वतःचं जीवन संपवलं. त्या स्वतःच्या क्षेत्रात सक्षम होत्या, पण घरगुती छळ, मानसिक अत्याचार, आणि नात्यांच्या नावाखाली केलेली क्रूरता यांच्याशी झुंजताना अखेर थकल्या.

या तिन्ही मृत्यूंची कहाणी वेगळी असली, तरी त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारी सामाजिक मानसिकता एकच आहे, स्त्री स्वातंत्र्य स्वीकारण्यास अजूनही नकार देणारी, पैशासाठी आणि वर्चस्वासाठी काहीही करण्यास तयार असलेली, पितृसत्तेची खोलवर रुजलेली मानसिक रचना.
गौरी पालवे: मुंबईत उठलेला राजकीय वादळ
केईएम रुग्णालयातील डॉक्टर. उच्चशिक्षित. नवविवाहित. भविष्य उज्ज्वल.
पण घरगुती ताण, भावनिक छळ आणि नात्यातील असमतोल यामुळे अखेर हे आयुष्य अचानक संपले.
या प्रकरणाला अधिक गांभीर्य मिळाले कारण गौरीचे पती हे राज्याच्या मंत्र्यांच्या, पंकजा मुंडे यांच्या, सचिव पदावर आहेत. त्यामुळे या मृत्यूप्रकरणावर राजकीय सावल्या आपोआप पडल्या. चौकशी निष्पक्ष होईल का? प्रभावशाली पदांमुळे सत्य दाबलं जाईल का? हे प्रश्न आता जनमानसात उभे आहेत.

गौरीने मृत्यूचा मार्ग का निवडला?
डॉक्टर असलेली, रुग्णांचे प्राण वाचवणारी मुलगी आपल्या वेदनांचे उपचार स्वतःसाठी शोधू शकली नाही.हीच समाजाची सामूहिक चूक नाही का?
साताऱ्यातील डॉ. संपदा मुंडे: शासकीय डॉक्टरचा शांत किंकाळी
संपदा मुंडे, सरकारी सेवेत कार्यरत, मेहनती, स्वप्नाळू तरुणी.
पण वैयक्तिक आयुष्यातील क्लेष तिच्या मनाला पोखरत होते. तिच्या मृत्यूने साताऱ्यापासून मंत्रिमंडळापर्यंत प्रश्न उपस्थित केले,सरकार स्त्री सुरक्षेबद्दल जे बोलते आणि वास्तवात काय घडतंय यात प्रचंड दरी का आहे?

पुण्यातील वैष्णवी हगवणे: ‘आयुष्य जगण्याची’ लढाई हरलेली मुलगी
पुण्यातील वैष्णवी, वय कमी, पण स्वप्न मोठी. तिच्यावर झालेला छळ इतका गंभीर होता की तिने शेवटचा मार्ग निवडला. आपलं आधुनिक पुणे, आपली शिक्षणनगरी, अशा एका मुलीला मानसिक आधार देऊ शकली नाही, हेच सर्वात मोठं अपयश.
ही फक्त तीन नावे नाहीत… हा एक संपूर्ण सामाजिक ढासळल्याचा नकाशा आहे.
तीनही मुली उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वतःचं करियर असलेल्या. म्हणजेच, ज्यांच्याकडे स्वातंत्र्याची किल्ली होती. मगही त्या तुटल्या, कोसळल्या, एकाकी पडल्या.
कारण..
शारीरिक छळ केवळ ओळखण्याजोगा असतो; मानसिक छळ अदृश्य, पण अधिक विध्वंसक
अस्वास्थ्यकर नात्यातील अपमान, हीनगंड वाढवणे, आर्थिक अवलंबित्वाची भावना निर्माण करणे, स्वप्नांवर नियंत्रण ठेवणे, हे सर्व रजाईखाली लपवलेले अत्याचार आहेत.
कौटुंबिक प्रतिष्ठा, मान-सन्मान, ‘लोक काय म्हणतील’ याखाली हजारो स्त्रिया आवाज गमावतात

• कायद्यांची भिंत आहे, पण अंमलबजावणीचे दार बंद
• 498-A असो, DV Act असो, कागदावर सर्व आहे. पण प्रत्यक्षात महिलेला पोलिसस्थानकातही दोषीच ठरवलं जातं.
• पुरुषप्रधान मानसिकता अजूनही स्त्रीच्या यशाला पचवू शकत नाही
उच्चभ्रू, सुशिक्षित घरांमध्येही विवाह म्हणजे अजूनही स्त्रीने ‘जुळवून घेण्याची’ एकतर्फी जबाबदारी.
सत्ता बदलली पण स्त्रीसुरक्षा तिथेच थांबली
गौरी पालवे प्रकरणात एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला.
जेव्हा आरोपी किंवा संशयित व्यक्ती सत्तेसंलग्न असेल तर न्यायाचा वेग मंदावतो.
ही बाब महाराष्ट्रापुरती नाही; संपूर्ण देशभर तीच स्थिती आहे.
राजकारणात ५० टक्के आरक्षण दिलं, पण घरगुती छळाचं प्रमाण तितकंच वाढतंय. कारण..
सत्तेतल्या पुरुषांचे हात कायद्याच्या दोऱ्यांना आपल्या सोयीने खेचू शकतात.
आत्महत्यांमागील प्रत्यक्ष कारणांवर सरकारी पातळीवर अनेकदा मौन धरले जाते.
समाजशास्त्रीय उपाय: ‘शिक्षण’ पुरेसं नाही,‘संस्कार’ बदलले पाहिजेत
आजच्या कायद्यात मानसिक अत्याचार सिद्ध करणे अवघड.
पण नातेवाईकांकडून दिलेला सततचा ताण, अपमान, कंट्रोलिंग बिहेवियर, व्यक्तिमत्वाचा संकोच, हे सर्व नेमके गुन्हेगारी स्वरूपात परिभाषितच नाही.
वैष्णवी, संपदा आणि गौरी यांच्या मृत्यूंनी समाज उजाड केला आहे.
या तिन्ही तरुणी अजूनही जिवंत असायला हव्या होत्या.
त्यांची स्वप्ने, त्यांची मेहनत, त्यांचे भविष्य,हे सर्व समाजाच्या सामूहिक अपराधामुळे हरवले.
मुली मरतायत… आणि आपण गप्प बसून ‘सुसंस्कृत महाराष्ट्र’ म्हणत फिरत आहोत.
वैष्णवी गप्प झाली.
संपदा निघून गेली.
गौरी आपल्याला सोडून गेली.
पण प्रश्न अजूनही आपल्यासमोर उभा आहे
मुली कितीही मोठ्या झाल्या, कितीही शिक्षित झाल्या, कितीही सक्षम झाल्या..
त्यांचं आयुष्य समाजाच्या विचारांवर अवलंबून असेल तर आपण किती मर्द आणि किती प्रगत म्हणायचं स्वतःला?
महाराष्ट्राला सावित्रीबाईंचा वारसा असल्याचं सांगताना आपण अभिमानाने बोलतो.
पण सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रात आज मुली भावनिक छळाला कंटाळून स्वतःचा जीव घेत आहेत.
यापेक्षा मोठा विरोधाभास कोणता?
हि महाराष्ट्रासाठी चेतावणी आहे..
मुलींचं आयुष्य वाचवायचं असेल तर मानसिकतेचा पाया बदलावा लागेल;
नाहीतर उद्या एखादी गौरी, संपदा किंवा वैष्णवी तुमच्या घरातूनही बाहेर पडेल,
आणि तुम्हाला आयुष्यभर पश्चात्तापाशिवाय काही उरणार नाही…


