फलटण प्रतिनिधी
“फलटणमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी शिवसेनेपुढे कोणाचीही दहशत चालत नाही. उलट आमचीच दहशत आहे,” अशा ठसक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मित्रपक्षांनाही स्पष्ट इशारा दिला. श्रीराम मंदिर परिसरात झालेल्या सभेत ते बोलत होते.
सभेला माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
देसाई म्हणाले, “फलटणच्या राजे कुटुंबाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने विकासाच्या दिशेने नवीन दारं उघडतील. नगरपालिकेच्या निवडणुकीत यांना काही वेगळे डावपेच सांगण्याची आवश्यकता नाही. लोकसेवेची परंपरा या घराण्याची आहे. २८ तारखेला नगरविकास खातेच फलटणला येणार असून शहरात निर्भय वातावरण तयार करण्याचा आमचा प्रयत्न असेल. शिंदे साहेबांच्या पाठीशी मजबूतपणे उभं आहोत.”
दीपक चव्हाण म्हणाले, “फलटण तालुक्याच्या विकासासाठी रामराजे यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले. इथली दहशत संपवण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला.”
रघुनाथराजे यांनी सांगितले, “शिवसेनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये असलेली असुरक्षिततेची भावना नाहीशी होईल. प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार आहे.”
संजीवराजे म्हणाले, “फलटणला योग्य दिशेने नेण्यासाठी शिवसेनेची साथ निवडली आहे. सर्वसामान्यांना संरक्षण आणि आधार मिळावा, हीच भूमिका. आता पुढील सर्व निर्णय शिवसेनेतूनच होतील.”
या वेळी रेश्मा भोसले, शरद कणसे, चंद्रकांत जाधव, अनिकेतराजे भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. आभार मिलिंद नेवसे यांनी मानले.
डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कठोर भूमिका
फलटणमधील डॉक्टरांच्या आत्महत्येच्या प्रकरणावर देसाई यांनी कडक भूमिका स्पष्ट केली. “या घटनेची चौकशी एसआयटीमार्फत सुरू आहे. आचारसंहिता असली तरी ती संपल्यानंतर एकाही दोषीला वाचू दिले जाणार नाही. मृत डॉक्टरला ज्यांनी प्रवृत्त केले, त्या प्रत्येकावर कठोर कारवाई झाल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.


