
फलटण प्रतिनिधी
फलटण|शहरात वाढत्या जबरी चोरी आणि घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष पेट्रोलिंगचे आदेश दिले होते. त्यानुसार फलटण शहर पोलिसांनी मंगळवारी (दि. ११ सप्टेंबर) रात्री दत्तनगर, सातारा रोड आणि हनुमाननगर परिसरात पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पद पिकअप गाडी रोखली. चौकशीत गाडी चालक निखील उर्फ काळू सुरेश जाधव (रा. तावडी, ता. फलटण) हा सराईत आणि तडीपार गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.
जाधववर जबरी चोरी, घरफोडीचे गंभीर गुन्हे दाखल असून २८ ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातून त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र आदेशाचा भंग करून तो फलटण शहरात दाखल झाला होता. तपासात त्याच्याकडील पिकअप गाडी मुंबईतून चोरीस गेल्याचे समोर आले. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गु.नं. २९८/२०२५, कलम १४२, १२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील गु.नं. २३९/२०२५ मधील फसवणूक आणि चोरी प्रकरणातील सुमारे पाच लाख रुपये किमतीची गाडीही हस्तगत करण्यात आली.
आरोपी जाधववर यापूर्वीही फलटण शहर पोलीस ठाण्यातील गु.नं. ११२/२०१६, २११/२०२४, २०३/२०२४, २११/२०२४, २९८/२०२५ असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे तसेच अंमलदार बापूराव धायगुडे, अतिश चांदुगडे, निलेश काळुखे, दादासाहेब यादव, पूनम वाघ, राणी फाळके, स्वप्नील खराडे आणि जितेंद्र टिके यांच्या पथकाने केली.