
फलटण प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नागपूरहून आलेल्या दोन भाविक वारकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील बारड येथे रविवारी घडली. या दुर्घटनेने संपूर्ण वारकरी संप्रदायात शोककळा पसरली असून, वारीच्या भक्तिभावात क्षणभर काळोख पसरला.
मृतांमध्ये मधुकर शेंडे आणि तुषार रामेश्वर बावनकुळे (दोघेही रा. राजाबाक्षा, जि. नागपूर) यांचा समावेश आहे. हे दोघेही आळंदीहून पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आले होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बारड येथे पालखी मुक्काम असताना विसाव्यासाठी तात्पुरते तंबू उभारण्याचे काम सुरू होते. याचवेळी तुषार बावनकुळे यांचा हात चुकून लोखंडी रॉडला लागला. संबंधित रॉड विद्युतप्रवाहाच्या संपर्कात असल्याने तुषार यांना तीव्र विजेचा धक्का बसला. त्यांच्या मदतीला धावलेल्या मधुकर शेंडे यांनाही विजेचा धक्का बसला आणि दोघांचाही घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेने वारकऱ्यांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त होत असून, पालखी सोहळ्याच्या अनुशासनबद्ध आणि भक्तिपर वातावरणात अचानक मृत्यूच्या सावटाने चिंता वाढवली आहे.
स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांकडून तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे. विद्युत सुरक्षेच्या अनुषंगाने गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, अशा अपघातांपासून वारकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी अधिक काटेकोर नियोजनाची गरज अधोरेखित झाली आहे.