सोलापूर प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘मैत्री’ आणि ‘स्पर्धा’ वेगळी असते. निवडणुकीत आम्ही एकमेकांविरुद्ध लढलो म्हणून शत्रू होत नाही. आमचा खरा विरोधक फक्त महाविकास आघाडीच आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूरमध्ये व्यक्त केले. स्थानिक दौऱ्यावर असताना विमानतळावर माध्यमांशी ते बोलत होते.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे आदी उपस्थित होते.
“उद्धव ठाकरे पक्षाची टीका म्हणजे जळजळ”
शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर जोरदार टीका केली. ‘रावण अहंकार’ म्हणणाऱ्यांनी पहिले आरशात बघावे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा मुख्यमंत्री झालेला काहींना पाहवत नाही. त्यामुळेच त्यांची मळमळ कायम असते, असे ते म्हणाले.
“घरात बसून समस्या सोडवता येत नाहीत. उंटावरून शेळ्या हाकणारे कोण आहेत, हे महाराष्ट्र जाणतो,” अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला.
योजनांचा उल्लेख, कामगिरीचं श्रेय
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीणसह समाजाच्या प्रत्येक घटकासाठीच्या योजना,’यांच्याच बळावर आम्हाला विधानसभेत मोठा विजय मिळाला, असा दावा शिंदेंनी केला. स्थानिक निवडणुकांमध्येही हीच कामगिरी जनतेसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“मला पाण्यात दिसतो म्हणे…”
विरोधकांच्या टीकेवर शिंदे म्हणाले, “माझ्यावर बोलणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. त्यांना एकनाथ शिंदे नेहमी पाण्यात दिसतो. मुघलांना जसे संत, धनाजी दिसायचे तसे त्यांना मी दिसतो. माझ्या नावाशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही.”
मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षे समाधानकारक काम केल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिंदे–फडणवीस दुराव्याच्या चर्चांना चोख प्रत्युत्तर
माध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या ‘दुराव्या’बाबत शिंदे म्हणाले, “मुकेश–नीता अंबानींच्या सत्कार सोहळ्यात आम्ही दोघे दोन्ही बाजूला बसलो, आणि लगेच अफवा सुरू झाल्या. या बातम्या म्हणजे केवळ टीआरपीसाठी तयार केलेल्या मनघडंत कथा आहेत.”
या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत स्पष्ट केले, “न बोलण्यासारखे काहीही घडलेले नाही. आम्ही सतत एकत्र आहोत. काही जण रंगवतात तसं काहीही प्रत्यक्षात नाही. असे चित्र तयार करणाऱ्यांची शेवटी गोची होणारच.”
अक्कलकोट सभेत हुकूम“विरोधकांना चारीमुंड्या चित करा”
अक्कलकोट व दुधनी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत शिंदे म्हणाले, “मी मुख्यमंत्री असताना केलेली कामे लोकांपर्यंत पोचवा. ‘लाडकी बहीण’ योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. या निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चित करण्याची शपथ घ्या.”


