सोलापूर प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीतील निवडणूक वादाला सोमवारी तीव्र कलाटणी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज तपासणीदरम्यान बाद करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले. अर्जातील सूचकाच्या सहीवरून निर्माण झालेल्या वादामुळे आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे.
थिटे यांचा अर्ज बाद करण्यामागे प्रशासनाने “काहीतरी टेक्निक” वापरल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी केला. “सूचक म्हणून थिटे यांच्या मुलाची सही निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच झाली होती. चार वेळा सह्या तपासल्या गेल्या. तरी अर्ज बाद कसा? प्रशासनाने सहीच ‘गायब’ केली का?” असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, माजी आमदार राजन पाटील यांच्या सूनबाईंच्या विरोधात थिटे यांनी अर्ज दाखल केला होता. अर्ज बाद झाल्याने त्या आता अनगरच्या पहिल्या नगराध्यक्षा ठरण्याची शक्यता आहे. “माझ्या अर्जाला हेतुपुरस्सर हरकती घेण्यात आल्या. अधिकाऱ्यांवर दबाव होता. आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत,” असे थिटे यांनी स्पष्ट केले.
सीसीटीव्ही फुटेजची मागणी
अर्ज प्रक्रियेदरम्यानच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची त्वरित तपासणी करण्यात यावी, तसेच त्यात छेडछाड होऊ नये, असा आग्रह पाटील यांनी धरला. “निवडणूक अधिकाऱ्यांनी विचारल्यानंतर सूचकाने त्यांच्या समोरच सही केली. हे सर्व रेकॉर्डमध्ये असल्यावरही अर्ज बाद करणे संशयास्पद आहे,” असे ते म्हणाले.
अर्जाच्या मूळ प्रतीची अधिकृत झेरॉक्स देण्यास प्रशासनाने नकार दिल्याबद्दलही त्यांनी सवाल उपस्थित केला. “प्रत्येक पानावर सही-शिक्का मागितला होता, तरतूद नाही म्हणत तोही नाकारला गेला. हे नेमके कोणाच्या दबावामुळे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
इशनन
“हा कसला बाहुबली?” ‘ पाटलांचा हल्लाबोल
राजन पाटील यांच्यावर जोरदार टीका करताना उमेश पाटील म्हणाले, “निवडणुकीला सामोरं जाण्याची हिंमत नसताना कसला बाहुबली? एका विधवा महिलेला घाबरून अर्ज बाद करणे ही कोणत्या ताकदीची भाषा आहे?” गावाच्या पाठिंब्याबाबतही त्यांनी उपरोधिक टीका केली.
“अनगरमध्ये जंगलराज”
“एका महिलेला अर्ज भरायला पोलीसांना स्टेनगन घेऊन जावं लागतं, हे लोकशाहीचे लक्षण आहे का? मोहोळ तालुक्यात चालणारा गुंडाराज आणि अनगरमधील प्रशासनावरचा दबाव पाहता, लोकशाहीचे अस्तित्वच धोक्यात येते,” असे पाटील म्हणाले.
अनगर नगरपंचायतीतील हा वाद आता निवडणूक आयोग, प्रशासन, तसेच राजकीय शक्तीपरीक्षेच्या अखाड्यात पोहोचला असून पुढील कायदेशीर पावले हा वाद आणखी तीव्र करण्याची शक्यता आहे.


