नागपूर प्रतिनिधी
महायुतीत मतभेदाचे सूर उमटत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य दुराव्याला आणखी खतपाणी मिळालं. शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात नाराजीच्या कुजबुजीला चांगलाच जोर आला होता. मात्र या सर्व तर्क-वितर्कांना फडणवीसांनी रविवारी ठाम शब्दांत फेटाळून लावत ‘कुठलाही दुरावा नाही’ असं स्पष्ट केलं.
नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले,
“आमच्या दोघांमध्ये कोणताही दुरावा नाही. आम्ही आज, काल आणि त्यापूर्वीही संवाद साधलाय, कार्यक्रमात एकत्र सहभागी झालो आहोत. एकमेकांशी न बोलण्यासारखं काही घडलंच नाही. माध्यमांनीच असं चित्र रंगवलं आहे. हा वेड्यांचा बाजार सुरू आहे आणि काही माध्यमं तर खरोखर वेडी झाली आहेत.”
ते पुढे म्हणाले,
“काही फुटेज दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. परवा आम्ही दोघं हुतात्मा स्मारकावर गेलो तेव्हा येताना-जाता आम्ही भेटलो. त्यांनी कुठे जाणार हे सांगितलं, मी कुठे जातोय हे त्यांना सांगितलं. पण काही क्षणांचे फोटो कापून ‘दोघं बोलले नाहीत’ असं दाखवलं गेलं. कालच्या कार्यक्रमातही आमच्या आजूबाजूला पुरस्कार्थी बसवण्याचं नियोजन होतं; तरीही स्टेजवर आणि नंतर आम्ही भेटलो.”
शिंदे यांनी दिल्लीत पक्षांतर्गत ‘फोडाफोडीच्या राजकारणा’बाबत तक्रार केल्यानंतर महायुतीत तणाव असल्याची चर्चा रंगली होती. बिहारमधील शपथविधी कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या देहबोलीवरूनही मतभेद असल्याचे सगळीकडे विश्लेषण सुरू झाले. त्यातच मुंबईतील हुतात्मा स्मारकाजवळील कार्यक्रमात केलेली औपचारिक अभिवादनाची देवाणघेवाण चर्चांना आणखी उधाण देणारी ठरली.
मात्र, या साऱ्यांना पूर्णविराम देत फडणवीसांनी स्पष्ट केलं.
“आमच्यात गैरसमज नाही, संवादही नियमितच आहे. चुकीचं चित्र रंगवलं जातंय.”
महायुतीतील सध्या सुरू असलेल्या ‘सगळं आलबेल नाही’ अशा चर्चेला फडणवीसांच्या या भूमिकेमुळे तरी तात्पुरता विराम मिळाल्याचं राजकीय निरीक्षकांचे मत आहे.


