नागपूर प्रतिनिधी
विदर्भातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळवून देण्यासाठी ऍग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात रविवारी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रातील वाढता वापर लक्षात घेऊन तूर, ऊस आणि संत्रा पिकांसाठी एकत्रित माहिती, उत्पादनवाढीचे मार्गदर्शन आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार साकारला.
ऍग्रोव्हिजन फाउंडेशन, नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग आणि बारामती ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यात हा करार झाला. यावेळी केंद्रीय मंत्री आणि ऍग्रोव्हिजनचे प्रवर्तक नितीन गडकरी, पद्मश्री प्रताप पवार, डॉ. शरद गडाख, डॉ. एच. बिसवास, डॉ. सी. डी. माई, सचिव रवी बोरटकर आदींची उपस्थिती होती. करारावर स्वाक्षऱ्या विवेक भोईटे, रवी बोरटकर आणि डॉ. बिसवास यांनी केल्या.
शेतकऱ्यांनी “विकासाचा हट्ट” धरावा : प्रताप पवार
शेतकरी स्वतःच्या उन्नतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारावे, अशी टिपण्णी पद्मश्री प्रताप पवार यांनी यावेळी केली. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती पद्धतीमुळे बारामती ट्रस्टच्या प्रयोगशाळेतील शेतकऱ्यांना एकरी तब्बल 150 टन ऊस उत्पादन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याचा कमी वापर, जमिनीची कसदारता टिकवणे आणि फॉस्फरस-रीच सेंद्रिय खतांचा वापर यामुळे उत्पादनात सातत्याने वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
विदर्भातील हजार शेतकऱ्यांची निवड
या कराराअंतर्गत प्रथम टप्प्यात विदर्भातील हजार शेतकरी निवडले जाणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. निवडलेल्या शेतकऱ्यांचे सॉईल हेल्थ कार्ड तयार करून खत, औषध व कीटकनाशकांचे वैज्ञानिक मूल्यमापन केले जाणार आहे.
तूर, ऊस आणि संत्रा पिकांसाठी एसओपी अंतिम टप्प्यात असून, बुटीबोरीतील वसंतदादा साखर उद्योग आणि पंजाबराव देशमुख विद्यापीठाच्या साहाय्याने आधुनिक तंत्रज्ञानाचे हस्तांतरण वेगाने होईल, असे ते म्हणाले.
वर्धा रोडवरील रेडिसनजवळ ऍग्रोव्हिजनचे सात मजली आधुनिक केंद्र उभारले जात असून जानेवारीपासून काम सुरू होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. एआय तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यास विदर्भ ‘आत्महत्या विरहित प्रदेश’ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांची भेट; एआय प्रयोगांची माहिती
दरम्यान, तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ऍग्रोव्हिजन प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भेट दिली. कृषी उत्पादने, पूरक उद्योग आणि एआय,आधारित कृषी प्रयोगांची माहिती त्यांनी घेतली.
अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रतापराव पवार, रवी बोरटकर, डॉ. सी. डी. मायी आदी मान्यवर उपस्थित होते. ऍग्रोव्हिजनचे हे सोळावे वर्ष असून फाउंडेशनच्या दहा वर्षांच्या कार्याचा आढावा घेणारे कॉफी टेबल बुकही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित झाले.
यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनातील विविध दालने, कंपन्या आणि कृषी तंत्रज्ञान स्टॉल्सची पाहणी केली.


