सांगली प्रतिनिधी
भारतीय क्रिकेटमधील स्टार फलंदाज स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या विवाह सोहळ्याची मोठी चर्चा सुरू असतानाच समडोळीतील मंधाना फार्महाऊसमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाच्या तयारीला उधाण आलेल्या या ठिकाणीच स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
या घटनेने लग्नस्थळी एकच गोंधळ उडाला. स्मृती आणि तिचे कुटुंबीय तातडीने सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले. सध्या श्रीनिवास मंधाना यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर सर्व आवश्यक उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या अनपेक्षित आरोग्य बिघाडामुळे स्मृती–पलाशचा आज नियोजित असलेला विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. सायंकाळी साडेचार वाजता मुहूर्त असूनही पाहुण्यांना परत पाठवण्याची वेळ आली.
घटनाक्रम काय?
स्मृती व पलाशचा विवाह सोहळा सांगलीतील खास तयारीसह आज पार पडणार होता. खेळ, राजकारण, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीची चर्चा रंगत असतानाच सकाळी नाश्ता करताना श्रीनिवास मंधाना यांची तब्येत अचानक बिघडली. सुरुवातीला किरकोळ असं वाटलेलं हे लक्षण काही वेळात गंभीर स्वरूपाचं ठरलं. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कुटुंबातील एका नातेवाईकाने सांगितले की, “स्मृतीचे वडील नाश्ता करत असताना अस्वस्थ झाले. काही वेळात त्यांची अवस्था अधिक बिघडल्याने आम्हाला रुग्णालयात न्यावे लागले. स्मृतीला तिच्या वडिलांवर प्रचंड प्रेम आहे. वडील पूर्णपणे बरे होईपर्यंत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय स्वतः स्मृतीने घेतला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय स्थिती काय सांगते?
उपचार करणारे डॉ. नमन शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास मंधाना यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना सौम्य स्वरूपाची हृदयविकाराची लक्षणे दिसून आली असून रक्तातील काही चाचण्या अहवालात बदल आढळले आहेत.
डॉ. शहा म्हणाले, “रुग्णांच्या रक्तदाबात वाढ झाली आहे. हृदयाशी संबंधित एन्झाईमचे प्रमाणही वाढले आहे. गरज पडल्यास एंजिओग्राफी करण्याचा विचार आहे. त्यांना यापूर्वी कधीही हृदयविकाराचा त्रास झाला नाही. पुढील किमान 12 तास त्यांच्यावर काटेकोर निरीक्षण ठेवण्यात येणार आहे.”
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाची संपूर्ण क्रिकेटविश्वात उत्सुकता असताना झालेल्या या घटनेने सोहळ्यावर विरजणाच पडला आहे. कुटुंबीयांनी मात्र स्पष्ट केले की, श्रीनिवास मंधाना पूर्णपणे सावरल्यानंतरच पुढील लग्नाच्या तारखेची घोषणा करण्यात येईल.


