सांगली प्रतिनिधी
मतदान म्हणजे केवळ कर्तव्य नव्हे तर लोकशाहीची सर्वात पवित्र ताकद आहे. हे आपण अनेकदा ऐकतो. पण सांगलीच्या शिराळ्यातील एका युवकाने या विचाराला शब्द नाही तर कृतीत उतरवत दाखवले आहे. मेलबर्नमध्ये नोकरी करणारा अन्सार कासम मुल्ला याने केवळ एका मतासाठी तब्बल २४ तासांचा प्रवास करत दीड लाखांचा खर्च केला आणि लोकशाहीप्रती आपली निष्ठा दृढ केली.
३० वर्षीय अन्सार मुल्ला मेलबर्नमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहे. २०१९ पासून ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेल्या अन्सारला कुटुंबाकडून कळले की २ डिसेंबर रोजी शिराळा नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. एवढं कळताच त्याने कोणताही विचार न करता मतदानासाठी भारतात येण्याचा निर्णय घेतला.
अन्सारचे वडील, कासम मुल्ला, शिराळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य. घरात राजकीय आणि सामाजिक कार्याची परंपरा. वडिलांच्या निधनानंतरही अन्सारने ही परंपरा पुढे नेत लोकशाहीबद्दलची जागरूकता जिवंत ठेवली आहे.
मतदानाच्या दिवशी अन्सारने मेलबर्न–क्वालालंपूर–मुंबई–सांगली–शिराळा असा थेट २४ तासांचा प्रवास केला. या प्रवासासाठी त्याच्या खिशातून तब्बल दीड लाख रुपये खर्च झाले. पण “मतदान हे श्रेष्ठ दान” ही त्याची धारणा त्यापेक्षा मोठी होती.
शिराळ्यात आगमन होताच मित्रांनी फटाक्यांच्या आतषबाजीत त्याचे स्वागत केले. कन्या शाळा मतदान केंद्रात जाऊन त्याने आपला मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर लगेचच पुन्हा ऑस्ट्रेलियासाठी प्रयाण केले.
अन्सारची ही कहाणी केवळ एका मतदाराची कथा नाही, तर मतदानप्रती असलेली निष्ठा, लोकशाहीवरील विश्वास आणि प्रणाली जिवंत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याची जाणीव करून देणारा संदेश आहे. भारतात राहणाऱ्यांसाठीच नव्हे तर परदेशात स्थायिक असलेल्या नागरिकांसाठीही तो प्रेरणादायी ठरतो.


