सांगली प्रतिनिधी
सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय छत्रछायेखाली वाढत गेलेल्या अतिक्रमणांवर अखेर प्रशासनाने धडाकेबाज मोहीम राबवली आहे. वाहतूक कोंडी, अरुंद होत जाणारे रस्ते आणि वाढती अस्वच्छता यामुळे तक्रारींचा भडिमार होत असताना अखेर महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी चार दिवसांपूर्वी अतिक्रमणविरोधी मोहिमेची गाडी ‘ॲक्शन मोड’मध्ये आणली.
या मोहिमेची चर्चा शहरभर सुरू असतानाच सत्ताधारी भाजपचे माजी मंत्री व विद्यमान आमदार सुरेश खाडे यांच्या विश्रामबाग येथील ‘दास’ बंगल्यासमोरील अतिक्रमणावरही जेसीबी फिरवल्याने मोठी खळबळ उडाली. अनेक वर्षांपासून टेपात राहिलेले हे प्रकरण प्रशासनाने धाडसाने हाताळल्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
राजकीय दबावाला छेद
सांगलीत अतिक्रमण हटवण्याचे प्रयत्न यापूर्वी अनेकदा अयशस्वी ठरत होते. फेरीवाल्यांचे शेड्स, रस्त्यालगत उभारलेली ढाबे–दुकाने आणि अनधिकृत पार्किंगमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असतानाही राजकीय दबावाचा धाक दाखवत मोहिमा मार्गातच थांबविल्या जात. या पार्श्वभूमीवर आयुक्त गांधी यांनी ‘कोणताही दबाव नाही, कोणतीही सूट नाही’ या भूमिकेतून मोहीम राबवण्यास सुरुवात केली.
अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या सहकार्याने लक्ष्मी मार्केट, माधवनगर, वालचंद कॉलेज परिसर, शंभर फुटी रस्ता, आपटा चौकी परिसर अशा गर्दीच्या भागातील अतिक्रमणे हटवली.
खाडे यांच्या अतिक्रमणावर कारवाई
चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान समाजमाध्यमांवर खाडे यांच्या बंगल्यासमोरील अतिक्रमणाचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात होता. या ठिकाणी उभारलेल्या भिंतीलगत वाहन पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी वाढत होती.
आज सकाळी कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेच्या पथकाने अचानक येथे मोर्चा वळवला. काही मिनिटांतच जेसीबीने भिंतीचे कुंपण जमीनदोस्त केले. या कारवाईनंतर शहरभर चर्चेला उधाण आले असून “अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण… मग ते सामान्यांचे असो किंवा आमदारांचे” अशा प्रतिक्रिया उमटताना दिसल्या.
प्रशासनाची शांतता, नागरिकांचे कौतुक
या कारवाईबाबत महापालिकेकडून अधिकृत पत्रक मात्र संध्याकाळपर्यंत जारी झाले नाही. मात्र घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे दिवसभर समाजमाध्यमांवर फिरत राहिली. अनेकांनी आयुक्तांच्या निर्धाराचे कौतुक करत अतिक्रमणमुक्त शहराची अपेक्षा व्यक्त केली.
शहराला ‘हेतू’ दाखवणारी मोहीम
अतिक्रमण हटवण्याच्या या मोहिमेमुळे शहरातील अनेक जुनाट प्रश्नांना हात घालण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. महापालिका प्रशासनाने पुढील काही दिवसांत शहरातील इतर प्राधान्याच्या ठिकाणी कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
सांगलीत अतिक्रमणविरोधी मोहीम ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर शहराचीही परीक्षा ठरणार आहे. नागरिकांनी साथ दिल्यास ही मोहीम शहराचा चेहरामोहरा बदलू शकते, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


