सांगली प्रतिनिधी
दिल्लीमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या सांगलीतील दहावीच्या विद्यार्थ्याने प्राचार्या आणि शिक्षिकांच्या कथित मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी उघडकीस आली. शौर्य प्रदीप पाटील (वय अंदाजे १५), असा मृत विद्यार्थ्याचा नाव असून त्याने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनवरून उडी मारून जीवन संपवले.
शौर्य हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील रहिवासी. सोने–चांदी गळई व्यवसाय करणारे त्याचे वडील प्रदीप पाटील हे अनेक वर्षांपासून दिल्लीतील राजीवनगर परिसरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. दिल्लीतील सेंट कोलंबस विद्यालयात दहावीमध्ये शिकत असलेला शौर्य नियमितपणे शाळेत जात होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो मानसिक तणावात असल्याची माहिती नंतर पुढे आली.
१८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून शौर्यने खाली उडी मारली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळी तपास करताना पोलिसांना शौर्यच्या स्कूल बॅगेतून दीड पानांची सुसाइड नोट मिळाली. या चिठ्ठीत त्याने शिक्षिकांकडून होणाऱ्या मानसिक छळाचा उल्लेख करत, “स्कूलवालोंने इतना बोला कि मुझे यह करना पड़ा…” असे मन हेलावून टाकणारे शब्द लिहिले. पुढे त्याने अंगदानाची इच्छा व्यक्त करत, “मम्मी-पप्पा सॉरी… आपका आखिरी बार दिल तोड़ रहा हूं…” असेही नमूद केले.
या प्रकरणी गार्डन मेट्रो पोलिसांनी शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल, तसेच शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच शौर्यचे वडील तातडीने दिल्लीला रवाना झाले असून, आज मूळ गावी ढवळेश्वर येथे शौर्यचा अंत्यसंस्कार होणार आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे सांगली तसेच दिल्लीतील मराठी बांधवांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


