सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यात मध्यरात्री घडलेल्या दुहेरी हत्येच्या घटनेने जिल्हा हादरला आहे. दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवस साजरा होत असतानाच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात मोहिते जागीच ठार झाले. परंतु काही क्षणांतच त्यांच्या समर्थकांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आणि हल्लेखोर शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख याचाही जागीच खात्मा झाला.
गारपीर परिसरात मंगळवारी मध्यरात्री हा थरार उडाला. माहितीप्रमाणे, मोहिते यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असतानाच शेखने गुप्तीने त्यांच्यावर सपासप वार केले. मोहिते गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडले. घटनेनंतर संतप्त जमावाने शेखवरही हल्ला चढवला आणि त्यात तोही ठार झाला.
पोलिसांनी सांगितले की, मोहिते आणि शेख यांच्यात जुना वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा प्रकार पूर्व वैमनस्यातून घडला की अन्य कोणत्यातरी कारणाने, याचा तपास सुरू आहे. या घटनेत आणखी चार जणांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
घटनेनंतर सांगली पोलिसांची संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या दुहेरी खुनानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे.
सांगलीत एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाने मध्यरात्रीच ‘मुळशी पॅटर्न’ शैलीत रक्तरंजित वळण घेतल्याने जिल्हाभरात चर्चेला ऊत आला आहे.


