सोलापूर प्रतिनिधी
टेंभुर्णी (जि. सोलापूर) येथे तीन महिन्यांपूर्वी घडलेला आणि नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला मॅनेजरला नग्न करून मारहाण करण्याचा प्रकार गंभीर स्वरूप धारण करत आहे. हॉटेल 7777 चे मालक लखन माने यांनी कामगारांवर दहशत निर्माण केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली. या प्रकरणी तब्बल आठ कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत मॅनेजरला सर्वांसमोर नग्न करून पाईपने मारहाण करत असल्याचे दिसत होते. या घटनेने जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. विशेष म्हणजे, घटना समोर आल्यानंतर आरोपी लखन माने यांनी सोशल मीडियावरून खुलासा देत मारहाण ‘चुकीच्या पद्धतीने’ व्हायरल झाल्याचा दावा केला होता. मात्र पोलिस तपासात माने यांचे दावे फोल ठरले.
मारहाण झालेल्या निवासी नखाते यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत उघड केले की, काम सोडून जाऊ नये म्हणून लखन माने यांनी दबाव टाकत त्यांच्यावर अत्याचार केला. त्यांना मारहाण करून खिशातील पैसे देखील काढून घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. आरोपीच्या दहशतीमुळे इतके दिवस मौन बाळगावे लागल्याची कबुलीही त्यांनी पोलिसांसमोर दिली.
टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, माने यांच्यावर दहशत माजवणे, जीवाला धोका निर्माण करणे यांसह गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. हॉटेलमधूनच त्याला ताब्यात घेण्यात आले असून या अमानुष कृत्याबाबत कठोर कारवाई केली जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे कामगार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून स्थानिक स्तरावर संतापाची लाट उसळली आहे. सत्ता, दडपशाही आणि भीतीच्या छायेत जगणाऱ्या अशा कामगारांच्या वेदना हा व्हिडिओ पुन्हा उघड करत असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे स्वागत केले जात आहे.


