सोलापूर प्रतिनिधी
करमाळा नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (शिंदे गट) उमेदवार दिग्विजय बागल यांच्यासह तब्बल 55 शाखाप्रमुखांनी आणि जवळपास 20 हजार शिवसैनिकांनी पक्षाला सामूहिक राजीनामे पाठवून एकप्रकारे शिंदे गटाशी दुराव्याची जाहीर घोषणा केली आहे.
बागल हे माजी मंत्री स्व. दिग्विजय बागल व माजी आमदार श्यामल बागल यांचे पुत्र असून करमाळ्यात त्यांचा प्रभावी गट मानला जातो. त्यामुळे त्यांच्या या पावलाने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
आतील वादातूनच निर्णय?
गत काही दिवसांत जिल्हाप्रमुख महेश चिवटे आणि दिग्विजय बागल यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. हा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने परिस्थिती बिघडली होती. यानंतर चिवटे यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांना शिवसेनेत दाखल करून करमाळा नगरपालिका निवडणुकांचे प्रभारीपद सोपवले. या निर्णयाने संतप्त झालेल्या बागल समर्थकांनी अखेर सामूहिक राजीनाम्याचा मार्ग अवलंबला.
भाजपकडे ‘मोठी’ हलचाल?
या घडामोडींमध्ये बागल गट अखेर कुठे जाणार याबाबत राजकीय तर्कवितर्क सुरूच आहेत. दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी “दिग्विजय बागल भाजपमध्ये येतील, असे संकेत त्यांच्या हालचालींवरून दिसत आहेत,” अशा शब्दांत भविष्यकालीन समीकरणांची हिंट दिली आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या काहीच दिवसांपूर्वी शिंदे सेनेतील इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली नाराजी आणि सामूहिक राजीनाम्यांची मालिका हा पक्षासाठी निश्चितच मोठा धक्का मानला जात आहे. करमाळ्यातील सत्ता समीकरणे आता नव्याने मांडली जाण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.


