सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी परिसरातील एका हॉटेलमध्ये मॅनेजरला नग्न करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘हॉटेल 77 77’ या ठिकाणी घडलेल्या या अमानुष वर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संतापाची लाट उसळली आहे. हॉटेलचा मालक लखन माने याने लोखंडी पाईपने मॅनेजरला सर्वांसमोर मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने नागरिकांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी जवळील एका हॉटेल मालकाने मॅनेजरच्या चुकीमुळे केली नग्न करून मारहाण .. व्हिडिओ झाला व्हायरल, त्यानंतर हॉटेल मालक आणि चालक या दोघांनीही त्या घटनेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.#solapurnews #Videoviral pic.twitter.com/BRIC9eD0iT
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 15, 2025
दरम्यान, व्हिडिओवरून उडालेल्या वादानंतर मालक लखन माने व संबंधित मॅनेजर यांनी एकत्रितपणे आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ‘माझ्याविषयी आणि हॉटेलविषयी चुकीची माहिती पसरवण्यासाठी मुद्दाम हाच व्हिडिओ वेगळ्या पद्धतीने व्हायरल करण्यात आला,’ असा दावा लखन माने यांनी केला.
त्यावर स्पष्टीकरण देताना संबंधित मॅनेजरने सांगितले की, ‘चार–पाच महिन्यांपूर्वी घरगुती तणावामुळे मी दारु सेवन केले होते. त्या अवस्थेत हॉटेलमध्ये आलो असता दादांनी मला शिक्षा केली होती. पण त्यांनी मला सतत मदत केली आहे. हवे तेव्हा पैसेही दिले आहेत. हा व्हिडिओ जे कोणी व्हायरल केला त्यांनी चुकीचे केले. आमच्या हॉटेलचे आणि दादांचे नाव बदनाम करण्यासाठी हा प्रकार मुद्दाम घडवला गेला,’ असे त्याने म्हटले.
यावर पुढे बोलताना लखन माने म्हणाले, ‘हॉटेल 77 77 हे आमच्यासाठी एक कुटुंब आहे. एखादी घटना घडल्यास तिच्यामागची सत्यता जाणून न घेता व्हिडिओ व्हायरल करणे चुकीचे आहे. मी कोणतेही गैरकृत्य केले नाही. आमचे नाते भावासारखे आहे. एवढ्या मोठ्या हॉटेलची जबाबदारी मी त्याच्याकडेच दिली नसती का? माझे नाव खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा हेतू कधीही सफल होणार नाही,’ असे त्यांनी म्हटले.
या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जनतेत संताप पसरला असून, ‘अशा उघडपणे मारहाण करणारा मालक अजूनही मोकाट कसा?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


