मुंबई प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने सर्वच पक्षांचे aspirant आता जोरदार तयारीला लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीत राजकारण्यांसोबतच सिनेविश्वातील व्यक्तीही मैदानात उतरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
याच पार्श्वभूमीवर अभिनेता अक्षय वाघमारे यांची पत्नी आणि अरुण गवळी यांची कन्या योगिता अरुणभाई गवळी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अधिकृतपणे इच्छुक उमेदवारीची घोषणा केली आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांनी भायखळ्याच्या प्रभाग क्रमांक २०७ मधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. “भायखळ्याच्या विकासासाठी रिंगणात उतरत आहे. २००४ मध्ये ‘डॅडीं’वर दाखवलेला विश्वास आणि दिलेला मतांचा आशीर्वाद यंदा पुन्हा मिळेल, अशी अपेक्षा आहे,” असे त्या म्हणाल्या.
“डॅडींनी जनतेची ज्या पद्धतीने सेवा केली, तोच समाजकारणाचा वारसा पुढे नेण्याचा माझा प्रयत्न असेल. नगरसेवक या पदाकडे सत्तेच्या दृष्टीने नव्हे, तर जबाबदारी म्हणून पाहणार आहे. मी उमेदवार म्हणून नव्हे, तर भायखळ्यातील प्रत्येक घरातील सदस्य म्हणून काम करू इच्छिते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गवळी परिवाराचा ‘समाजकारण’ हा नेहमीच केंद्रबिंदू राहिल्याचा उल्लेख करत, “मला सेवा करण्याची एकच संधी द्यावी,” अशी विनंतीही त्यांनी पोस्टमध्ये केली.
योगिता गवळी यांनी २०१९ साली अभिनेता अक्षय वाघमारे याच्याशी विवाह केला. आता भायखळ्यातील राजकीय समीकरणांमध्ये त्यांची एन्ट्री कितपत प्रभाव दाखवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


