मुंबई प्रतिनिधी
परदेशात प्रवासासाठी अत्यावश्यक असलेल्या भारतीय पासपोर्ट सेवेत केंद्र सरकारने मोठा बदल जाहीर केला आहे. पासपोर्ट सेवा कार्यक्रम (PSP) V2.0 अंतर्गत देशभरात ई-पासपोर्ट प्रणाली लागू करण्यात आली असून, भारतातील तसेच परदेशातील सर्व दूतावासांमधून आता फक्त चिप-सक्षम ई-पासपोर्टच जारी केले जाणार आहेत.
या नव्या प्रणालीमुळे पासपोर्टची सुरक्षा अधिक मजबूत होणार असून, इमिग्रेशन प्रक्रियाही पूर्वीपेक्षा अधिक वेगवान होणार आहे. दरम्यान, “जुने पासपोर्ट आता अमान्य ठरणार का?” हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. मात्र, याबद्दल सरकारने स्पष्ट केले की जुने पासपोर्ट त्यांच्या वैधतेनुसार पूर्वीसारखेच वापरता येणार आहेत. त्यांची वैधता संपेपर्यंत कोणताही बदल आवश्यक होणार नाही.
सध्याचा पासपोर्ट कालबाह्य झाल्यानंतर नूतनीकरणाच्या वेळी चिप-आधारित ई-पासपोर्टच जारी केला जाईल. नवीन अर्जदारांनाही थेट ई-पासपोर्ट मिळणार असून, यासाठी कोणतेही स्वतंत्र फॉर्म किंवा अतिरिक्त पर्याय निवडण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहणार आहे; फक्त पासपोर्टचे स्वरूप आधुनिक होत आहे.
ई-पासपोर्टमध्ये कव्हरमध्ये एम्बेडेड RFID सक्षम सोन्याची मायक्रोचिप असते. या चिपमध्ये पासपोर्ट धारकाची वैयक्तिक माहिती तसेच बायोमेट्रिक तपशील सुरक्षितरीत्या संग्रहित केलेले असतात. त्यामुळे बनावट पासपोर्ट किंवा माहिती गैरवापराची शक्यता आणखी कमी होणार आहे.
PSP V2.0 आणि ग्लोबल पासपोर्ट सेवा कार्यक्रमांतर्गत आता जारी होणारे सर्व नवे तसेच नूतनीकरण केलेले पासपोर्ट अनिवार्यपणे ई-पासपोर्ट असतील. सरकारच्या या निर्णयामुळे पासपोर्ट सेवांचा दर्जा उंचावणार असून, प्रवाशांना आधुनिक, सुरक्षित व जलद सेवा उपलब्ध होणार आहे.


