सोलापूर प्रतिनिधी
विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीतील समर्थ ज्वेलर्स दुकानात दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या सात जणांचा कट अखेर पोलिसांनी उधळला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने पाच दिवसांच्या अविरत तपासानंतर चौघांना जेरबंद केले असून, एक विधीसंघर्षग्रस्त बालक यामध्ये सामील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोन मुख्य आरोपी अजिंक्य चव्हाण आणि विशाल जाधव हे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
या टोळीने अत्यंत नियोजनबद्धरीत्या दरोड्याची आखणी केली होती. लाखो रुपयांचे दागिने असलेल्या ज्वेलर्स दुकानाची ‘रेकी’ करून कमी गर्दीच्या वेळेस आणि सहज पळून जाता येईल अशा दुकानाची निवड करण्यात आली. त्यानंतर सात जण १ नोव्हेंबर रोजी दुपारी दमाणी नगरातील गोल्डन जिमसमोरच्या मैदानात एकत्र आले आणि दरोड्याचा संपूर्ण प्लॅन तयार केला. साहील गायकवाड आणि समर्थ गायकवाड यांनी दुकानाची रेकी केली होती. दरोड्याची वेळ पावणेआठ ठरवण्यात आली होती.
ठरल्याप्रमाणे दोन्ही दुचाक्यांवर सहाजण दुकानाजवळ पोचले; परंतु दुकानदाराच्या आरडाओरडीनंतर लोक जमा होऊ लागल्याने फक्त ३० सेकंदांत सर्व आरोपी पसार झाले. मात्र, पोलिसांनी त्यांच्या मागावर राहून गुन्हेगारांना पकडले.
दुचाकीचा रंग बदलून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
मुख्य आरोपी अजिंक्य चव्हाण याच्याकडे विनानंबरप्लेटची पांढऱ्या रंगाची दुचाकी होती. पोलिसांची ओळख टाळण्यासाठी दरोड्यापूर्वी त्यांनी त्या वाहनावर निळ्या रंगाचा स्प्रे मारला. दरोडा फसल्यावर सर्व आरोपी लिमयेवाडीतील समर्थ गायकवाडच्या घराजवळ जमले आणि पेट्रोल टाकून दुचाकीवरील रंग काढून टाकला. पोलिसांच्या माहितीनुसार, दरोड्यासाठी अशा प्रकारे वाहनाचा रंग बदलण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.
१२५ सीसीटीव्हींच्या पडताळणीनंतर मिळाली गुन्हेगारांची धागादोरा
दरोड्याच्या प्रयत्नाची वार्ता पसरताच शहर पोलिसांनी सर्व पथके कामाला लावली. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी स्वतः तपासाची माहिती घेतली. गुन्हे शाखेच्या पथकाने विजापूर नाका परिसरातील १२५ सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये दरोड्याच्या वेळी एक दुचाकीमागे दुसरी दुचाकी जात असल्याचे आढळून आले. त्या दुचाकीचा माग काढताच संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला.
यशस्वी कारवाई
ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर, शंकर धायगुडे, विजय पाटील, मुकेश गायकवाड, निलेश सोनवणे, तुकाराम घाडगे आणि दत्तात्रय काळे यांच्या पथकाने केली.
सध्या अजिंक्य चव्हाण आणि विशाल जाधव यांचा शोध सुरू असून, त्यांच्या अटकेनंतर या दरोडा प्रयत्नामागील संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


