मुंबई प्रतिनिधी
दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्कतेवर असताना मुंबईच्या मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशनबाहेर शुक्रवारी दुपारी एक संशयित बॅग आढळून खळबळ उडाली. अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या या परिसरात जवळपास दोन तासांपासून बॅग पडून असल्याची प्राथमिक माहिती मिळताच रेल्वे आणि स्थानिक पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या.
घटनास्थळी तातडीने बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिसर तातडीने रिकामा करून नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले. सीएसएमटीच्या पोस्ट ऑफिसकडे जाणाऱ्या मार्गावर ही लाल रंगाची बॅग आढळली. गर्दीची वेळ नसतानाही स्टेशन परिसरात काही काळ वाहतूक आणि पादचारी हालचाल नियंत्रित ठेवण्यात आली.
सीएसएमटी स्थानकावर 26/11 नंतर कायम कडक सुरक्षा उपाययोजना राबवल्या जातात. पर्यटकांची मोठी वर्दळ आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे हा परिसर सतत सुरक्षा तपासणीच्या कक्षेत असतो. त्यामुळे संशयित वस्तू आढळताच यंत्रणा सक्रिय झाल्या.
‘मेटल डिटेक्टर’ तपासणीनंतर बॅगेचे उघडके
शोधक पथकाने प्रथम बॅगची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली. जवळपास दहा मिनिटांच्या तपासणीनंतर बॅग सुरक्षित असल्याची खात्री करून ती उघडण्यात आली. बॅगेत सुरुवातीला कागदपत्रे आणि काही कपडे आढळले असून ते बाहेर काढून स्वतंत्रपणे तपासासाठी पाठवण्यात आले. अधिकाऱ्यांनी बॅगमधील सर्व सामग्रीची तपशीलवार छाननी सुरू ठेवली आहे.
या बॅगचा मालक कोण, ती तिथे कशी पडली आणि किती वेळापासून ठेवण्यात आली होती, याचा सखोल तपास सुरू आहे. आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास केला जात असून स्टेशन सुरक्षेनेही स्वतंत्ररीत्या चौकशी सुरू केली आहे.
देशातील सतत वाढणाऱ्या सुरक्षेच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी स्टेशनबाहेरची ही घटना नागरिकांना काही काळ काळजीत टाकणारी ठरली. मात्र, तात्काळ प्रतिसाद देत सुरक्षा यंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.


