सांगली प्रतिनिधी
विटा (जि. सांगली) : अवघ्या सहा दिवसांवर लगीनघाईचं वातावरण असताना विटा शहरातील सावरकरनगर परिसरात भीषण स्फोटाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जय हनुमान स्टील सेंटर या दुकानात अचानक स्फोट झाला. दुकानाच्या वरच्या मजल्यावर जोशी कुटुंब राहात होतं. स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण इमारत जळून खाक झाली. या आगीत दुकानमालक विष्णू पांडुरंग जोशी (वय 47), त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी (वय 42), मुलगी प्रियांका योगेश इंगळे (वय 25) आणि दोन वर्षांची नात सृष्टी योगेश इंगळे या चौघांचा जागीच मृत्यू झाला.
सुरुवातीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही क्षणांतच ही आग विक्राळ रूप धारण करत संपूर्ण तीन मजली इमारतीला कवेत घेतली. दुकानाच्या शटरमधून अचानक धूर येताना दिसल्याने नागरिकांनी तातडीने विटा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत जोशी कुटुंबातील चार जण जळून खाक झाले होते.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विटा नगरपालिकेसह कडेगाव नगरपंचायत, कुंडल, उदगिरी, पलूस आणि तासगाव येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आजुबाजूला घरे चिटकून असल्यामुळे मदतकार्य सुरळीत पार पाडण्यात मोठी अडचण आली.
अवघ्या काही दिवसांवर घरातील लग्नसोहळा असल्याने जोशी कुटुंब आनंदात होते. मात्र या स्फोटाने सगळं काही राख झालं. संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून नागरिकांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नाहीत.


