सांगली प्रतिनिधी
बैलगाडी शर्यतींच्या परंपरेत नव्या इतिहासाची पानं लिहिली गेली आहेत. सांगली जिल्ह्यातील बोरगाव (कोड्याची माळ) येथे पार पडलेल्या देशातील सर्वात मोठ्या ‘श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीत’ ‘हेलिकॉप्टर बैज्या’ आणि ‘ब्रेकफेल बैलजोडी’ यांनी मैदान गाजवत मानाचा फॉर्च्युनर किताब पटकावला.
‘डबल महाराष्ट्र केसरी’ आणि शिवसेना नेते पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित या शर्यतीने मराठी मातीतील बैलगाडी शौकिनांना अक्षरशः वेड लावले. तब्बल ५०० एकरांवर उभारण्यात आलेल्या या भव्य मैदानावर हजारो बैलगाड्यांनी धाव घेतली, तर लाखो प्रेक्षकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या शर्यतीत विजेत्यांसाठी ठेवण्यात आलेली बक्षिसंही तितकीच थाटामाटातली होती, ‘थार, फॉर्च्युनर, ट्रॅक्टर आणि तब्बल १५० दुचाक्या! या शर्यतीचा शंखनाद राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. शर्यतीत जबरदस्त गती, नियंत्रण आणि जोडीतील सामंजस्य दाखवत ‘हेलिकॉप्टर बैज्या’ आणि ‘ब्रेकफेल’ जोडीने ‘श्रीनाथ केसरी’चा मानाचा बहुमान पटकावला आणि थेट फॉर्च्युनर गाडी आपल्या नावावर केली.
विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा हा मुंबईतील मंत्रालयासमोर पार पडणार असल्याची घोषणा आयोजक चंद्रहार पाटील यांनी यावेळी केली. त्यांनी पुढे सांगितले की, “पुढील वर्षीची शर्यत आणखी भव्य असणार आहे. त्या वेळी विजेत्यांसाठी बीएमडब्ल्यू कार बक्षीस म्हणून ठेवली जाईल,” असं सांगत त्यांनी उपस्थित प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसादही मिळवला.
या शर्यतीने केवळ पारंपरिक खेळाचा उत्सव नव्हे, तर ग्रामीण महाराष्ट्रातील उत्साह, स्पर्धात्मक वृत्ती आणि बैलप्रेम याचं दर्शन घडवलं. सांगलीच्या मातीतील या थरारक स्पर्धेने राज्यभरातील बैलगाडीप्रेमींना एकत्र आणत पुन्हा एकदा दाखवून दिलं की, “बैलगाडी शर्यत म्हणजे महाराष्ट्राचं जीवंत वारस!”


