मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांच्या नव्या यादीतून वगळल्यानंतर रुपाली ठोंबरे या नव्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रवक्त्यांच्या यादीतून त्यांना वगळताच, ठाकरे गटाकडून त्यांच्या दिशेने ‘पहिली ऑफर’ दिली गेली आहे.
शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी ठोंबरे यांचं कौतुक करत स्पष्ट शब्दांत म्हटलं, “रूपाली ठोंबरे या माझ्या चांगल्या मैत्रीणी आहेत. त्या शिवसेनेत यायचं ठरवलं तर आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करू.”
अंधारे यांनी ठोंबरेंच्या स्वच्छ प्रतिमेचा उल्लेख करत म्हटलं, “तिला ईडी, सीबीआय यांसारखं काहीच बॅगेज नाही. ती एक क्लीन इमेज असलेली महिला आहे. अशी व्यक्ती कोणत्याही पक्षात आली, तरी तो पक्ष श्रीमंत होतो. मात्र मी तिच्या पक्षात नुकसान व्हावं म्हणून तिला बोलवणारी नाही. तिच्या पक्षात तिला संधी मिळत असेल, तर तिनं तिथेच काम करावं.”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांना वगळण्यात आलं आहे. पक्षविरोधी वक्तव्यांमुळे ठोंबरेंना पदावरून हटवण्यात आल्याचं सांगितलं जातं. काही दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात ठोंबरेंनी उघडपणे आवाज उठवला होता. या वादानंतर त्यांनी अजित पवारांची भेट घेऊन स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र, अखेर त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली.
दरम्यान, पक्षातील वादात सापडलेले सूरज चव्हाण यांना पुन्हा प्रवक्तेपद देण्यात आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडींना आता नवा राजकीय कलाटणीबिंदू मिळाल्याचं दिसून येत आहे.
रुपाली ठोंबरेंना ठाकरे गटाकडून आलेल्या या ऑफरमुळे, त्यांचा पुढचा राजकीय निर्णय नेमका काय असणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.


