मुंबई प्रतिनिधी
मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवे मारण्याच्या कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या सुरक्षेबाबतही गंभीर इशारा समोर आला आहे.
दमानिया यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन “माझा गेम केला जाणार आहे” असा धक्कादायक दावा केला आहे.
अंजली दमानिया काही दिवस अमेरिकेत होत्या. तेथे असतानाच त्यांना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला. त्या अधिकाऱ्यांनी “आपल्याबाबत काही इनपुट्स आहेत, तुमच्या जीवाला धोका आहे” असा इशारा दिला. त्याचबरोबर, “गाड्या बदलत राहा, फोन स्विच ऑफ ठेवा, सावधान राहा” असा थेट सल्लाही देण्यात आला.
दमानिया भारतात सोमवार, १० ऑक्टोबर रोजी परतल्या आणि तातडीने पत्रकार परिषद घेऊन परिस्थिती उघडकीस आणली. त्या म्हणाल्या,
“मी अमेरिकेत असताना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की, ‘यांचं अती होतंय, यांचा गेम करायचाय’. त्यामुळे सावध राहा, गाड्या बदलत राहा आणि फोन बंद ठेवा.’”
विशेष म्हणजे, मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा इशारा ज्या दिवशी मिळाला, त्याच्या आधीच्या दिवशीच दमानियांना हा फोन आला होता, असा खुलासा त्यांनी केला.
“सुरक्षा नको, धमक्यांना झुकणार नाही”
दमानिया म्हणाल्या,
“अधिकाऱ्यांनी मला सुरक्षा घेण्याचा सल्ला दिला आहे. पण मी आधीच लिहून दिलंय की, मला सुरक्षा नको. धमक्या देऊन, खोटे खटले दाखल करून मला गप्प करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण मी मागे हटणार नाही.”
त्या पुढे म्हणाल्या की, या सर्व घडामोडींबाबत त्यांनी मुख्यमंत्री यांनाही माहिती दिली आहे.
अंजली दमानिया आणि मनोज जरांगे या दोघांनाही मिळालेल्या इशाऱ्यांमुळे राज्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


