मुंबई प्रतिनिधी
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात नवा अध्याय सुरू झाला आहे. पत्नी शेहझीन सिद्दीकी यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले असून, पोलिस तपासाबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांच्या याचिकेत तपासाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेहझीन सिद्दीकी यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, मुंबई पोलिसांचा तपास अपूर्ण, दिशाभूल करणारा आणि प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी आखलेला आहे. हत्येतील खरे सूत्रधार अद्याप बाहेरच असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. “चौकशीदरम्यान आम्ही दिलेल्या अनेक महत्त्वाच्या माहितींकडे आणि जबाबांकडे पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले,” असा आरोपही त्यांनी याचिकेत केला आहे.
तपास ‘डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखा’ ठरल्याची टीका करत शेहझीन सिद्दीकी म्हणतात, “हत्येचा तपास अर्ध्यावर सोडला गेला आहे. काही आरोपी पकडले गेले असले, तरी त्यामागील खरे सुत्रधार अद्याप मोकाट फिरत आहेत.”
हत्येच्या तपासात राजकीय हस्तक्षेप?
याचिकेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उचलण्यात आला आहे, राजकीय आणि प्रभावशाली व्यक्तींचा हस्तक्षेप. या व्यक्तींना वाचवण्यासाठी तपासाचा वेग कमी करण्यात आला, काही महत्त्वाच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाने स्वतंत्र SIT स्थापन करून तपासाची सूत्रे हातात घ्यावीत, अशी मागणी शेहझीन यांनी केली आहे.
या प्रकरणी पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला होणार आहे.
हत्या प्रकरणाचा थरारक पार्श्वभूमी
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे येथे झालेल्या गोळीबारात माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तेव्हा ते आपल्या पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित होते. या घटनेनंतर मुंबईत आणि राज्यभरात राजकीय संताप उसळला होता.
हत्येनंतर काही दिवसांतच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. बिश्नोई टोळीने अनेक राज्यांमध्ये आपले जाळे पसरवले असून, ७०० हून अधिक शूटर त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत, असा खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) आरोपपत्रात करण्यात आला आहे.
१९९०च्या दशकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने जसा गुन्हेगारीचा साम्राज्य विस्तार केला होता, त्याच पद्धतीने बिश्नोई टोळीही संघटित गुन्हेगारीचं नवं जाळं उभारत असल्याचं NIA ने नमूद केलं आहे.
राजकीय, पोलिस आणि अंडरवर्ल्डच्या त्रिकोणात अडकलेलं हे प्रकरण आता न्यायालयीन पातळीवर नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे.
आता पाहावं लागेल की उच्च न्यायालय एसआयटी स्थापन करण्याच्या मागणीवर काय भूमिका घेतं, आणि खरंच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा गूढ तपास अखेर न्याय्य मार्गाने सुटतो का?


