मुंबई प्रतिनिधी
स्वस्तात घर मिळवण्याच्या आशेने अनेकांनी आयुष्यभराची बचत खर्च केली, पण शेवटी या सर्वांना गंडा बसल्याचं उघड झालं आहे. वडाळा (पश्चिम) येथील ‘स्काय ३१’ या गृहप्रकल्पात तब्बल १०३ घरखरेदीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी बी. पी. गंगर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम कंपनीविरुद्ध रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
पुनर्विकासाच्या नावाखाली स्वस्त घराचे आमिष
‘स्काय ३१’ हा प्रकल्प बी. पी. गंगर कन्स्ट्रक्शन या कंपनीकडून उभारला जात असल्याची माहिती काहींना मिळाली. पुनर्विकास योजनेत स्थानिक रहिवाशांना घरे देऊन उर्वरित विक्रीयोग्य फ्लॅट्स सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात करण्यात आली होती.
कांदिवलीतील एका चार्टर्ड अकाउंटंटने बुकिंगसाठी लाखो रुपये भरून कंपनीशी करार केला. मात्र ठरल्याप्रमाणे घर मिळाले नाही. चौकशी केल्यानंतर समोर आलेली वस्तुस्थिती धक्कादायक होती. एकाच फ्लॅटचे बुकिंग अनेक लोकांकडून घेण्यात आले होते!
एकत्र आले पीडित; पोलिसांकडे तक्रार
फसवणुकीचा अंदाज आल्यानंतर पीडित नागरिक एकत्र आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. प्राथमिक तपासात १०३ जणांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. बुकिंगच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे.
संचालकांवर गुन्हा दाखल
या प्रकरणात कंपनीचे संचालक सुब्बरामन विलायनूर, उमा विलायनूर आणि इतर अधिकारी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण गंभीर असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
मुंबईतील घरबांधणी प्रकल्पांवर आधीच संशयाचे सावट असताना या प्रकरणाने पुन्हा एकदा इशारा दिला आहे
“स्वस्तात घर” या आमिषामागे आयुष्याची बचत पणाला लागू शकते!


