• रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर गोंधळात दुर्घटना
मुंबई प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या सॅंडहर्स्ट रोड स्थानकाजवळ गुरुवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणीसह दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गाड्या सुरू होणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने काही प्रवासी रुळावरून पायी चालत जात होते. त्याचवेळी लोकलने या प्रवाशांना धडक दिली.

ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेल्यांमध्ये १९ वर्षीय हैली मोहमाया आणि एका ओळख न पटलेल्या ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जखमींमध्ये कैफ चोगले (२२), हाफिजा चोगले (६२) आणि खुशबू मोहमाया (४५) या तिघांचा समावेश आहे. जखमी प्रवाशांना तत्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जे.जे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कैफ आणि हाफिजा चोगले यांनी प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला, तर खुशबू मोहमाया यांच्यावर उपचार सुरू आहेत. एका जखमी प्रवाशाच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या डोक्यालाही मार बसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
रेल्वे सेवेत आलेल्या विस्कळीतपणामुळे अनेक प्रवासी पायी प्रवास करत होते. त्याचदरम्यान हा अपघात घडल्याने सॅंडहर्स्ट रोड परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मध्य रेल्वे प्रशासनाकडून अपघाताबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.


