सोलापूर प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा महत्त्वाचा रणशिंग लवकरच फुंकले जाण्याची शक्यता आहे. १५ नोव्हेंबरपूर्वीच आचारसंहिता लागू होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात असून, या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते लाभार्थींना आगाऊ देण्याचा विचार सरकारकडून सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.
लोकसभा निवडणुकांनंतर राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ‘महायुती’साठी गेमचेंजर ठरली. सुमारे अडीच कोटी महिलांनी अर्ज केले असून, १ जुलै २०२४ पासून लाभाचा प्रारंभ झाला. प्रचारादरम्यान मासिक लाभ दीड हजारांहून २१०० रुपये करण्याची घोषणाही करण्यात आली होती.
दरम्यान, दिवाळीच्या तोंडावर ई-केवायसी प्रक्रियेमुळे अनेक लाभार्थींना ऑक्टोबरचा हप्ता मिळण्यात विलंब झाला. आता निवडणुकांची घोषणा आणि आचारसंहिता लागू होण्याच्या उंबरठ्यावर असल्याने नोव्हेंबरचा हप्ता थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लाभार्थी महिला नाराज होऊ नयेत यासाठी दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित देण्याची चर्चा सुरू आहे.
ई-केवायसीची मुदत वाढण्याची शक्यता
योजनेअंतर्गत सर्व लाभार्थींना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. आतापर्यंत बहुतेकांनी प्रक्रिया पूर्ण केली असून, उर्वरितांसाठी १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. मात्र स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मुदत आणखी वाढण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
योजनेचा अंदाजे आर्थिक भार
* एकूण लाभार्थी : ~२.१० कोटी
* दरमहा खर्च : ₹३,१५० कोटी
* दोन महिन्यांचा खर्च : ₹६,३०० कोटी
अधिकाऱ्यांचे म्हणणे
“पात्र लाभार्थींनी निर्धारित कालावधीत ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर लाभ नियमित सुरू राहणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यास निवडणुकीनंतरच पुढील वितरण होईल; त्यामुळे लाभार्थींनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.”
दिपक ढेपे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर


