मुंबई प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून, निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषदेत कार्यक्रम जाहीर केला. यानुसार २ डिसेंबर रोजी राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून, निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे.
दरम्यान, मतदार याद्यांमधील त्रुटींवरून विरोधकांकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आक्षेप नोंदवण्यात येत होते. त्रुटी दूर होईपर्यंत निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी महाविकास आघाडी आणि मनसेकडून करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष करत कार्यक्रम जाहीर केला.
या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सामाजिक माध्यमावर पोस्ट शेअर करत आयोगावर तोफ डागली.
“आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप पाहिली आणि तळपायाची आग मस्तकात गेली. आयोग स्वायत्त आहे, ही केवळ संविधानातील ओळ वाटते; प्रत्यक्षात तो सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुला झाला आहे,” अशी टीका ठाकरे यांनी केली.
दुबार नोंदणीपासून मतदार याद्यांतील इतर घोळांवर आयोगाने ठोस उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही त्यांनी केला. “जबाबदारी तुम्ही केव्हाच झटकली; आता उत्तरदायित्वही नाकारत आहात, तर या पदांचा उपयोग काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच पत्रकार परिषदेत आयोगाला सलग प्रश्न विचारत दणका देणाऱ्या पत्रकारांचे त्यांनी अभिनंदन केले.


