मुंबई प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना भांडूप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपासून अस्वस्थता जाणवत असल्याने त्यांनी वैद्यकीय तपासणी केली होती. त्यानंतर उपचार सुरू असतानाच प्रकृतीत आणखी बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.
राऊत यांच्यावर रुग्णालयात आवश्यक ती वैद्यकीय तपासणी सुरू असून, तपासण्या पूर्ण झाल्यानंतर ते भांडूप येथील मैत्री निवासस्थानी विश्रांती घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रकृती ठीक नसल्याने गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे सार्वजनिक कार्यक्रमांपासून तसेच माध्यमांपासून दूर आहेत.
याबाबत त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रक जारी करून प्रकृतीविषयी माहिती दिली होती. “अचानक प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याने उपचार सुरू असून, वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर जाण्यावर आणि गर्दी टाळण्यावर निर्बंध आहेत. मात्र मी लवकरच संपूर्णपणे बरा होऊन नवीन वर्षात कार्यकर्त्यांच्या भेटीस येईन,” असे त्यांनी पत्रकात नमूद केले होते.
राऊत यांच्या प्रकृतीविषयी माहिती समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.


