
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला अखेर वेग येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने नियोजित पत्रकार परिषद मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी आयोजित केली असून, या वेळी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्याच दिवशी संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ३१ जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आगामी ८५ दिवसांत तीन टप्प्यांत हा मतदानाचा उत्सव पार पडणार आहे. राज्यातील तब्बल नऊ कोटींपेक्षा अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
पहिला टप्पा : नगरपालिका व नगरपंचायती
एकूण २८९ नगरपालिका तसेच नगरपंचायतींच्या निवडणुका सर्वप्रथम होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रभाग रचना, नगराध्यक्ष आरक्षण आणि अंतिम मतदार यादी जाहीर झाल्याने या निवडणुकांना प्राधान्य दिले जाणार आहे. पहिला टप्पा साधारण २१ ते २५ दिवसांचा असण्याची शक्यता.
दुसरा टप्पा : जिल्हा परिषद व पंचायत समित्या
३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. मात्र मतदार यादी प्रक्रियेला अजून मुदत असल्याने या संस्था दुसऱ्या टप्प्यात. हा टप्पा साधारण ३० ते ३५ दिवसांचा असेल, असा अंदाज.
तिसरा टप्पा : महापालिका निवडणुका
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी प्रभाग रचना व महापौरांचे आरक्षण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे. तसेच ६ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने महापालिका निवडणुका अखेरीस, म्हणजे तिसऱ्या टप्प्यात. या टप्प्याचा कालावधी अंदाजे २५ ते ३० दिवसांचा असणार आहे.
मतदार यादीतील गोंधळ आणि तक्रारी
मतदार यादीतील विसंगती, विशेषत: मोठ्या प्रमाणावर नावे गहाळ झाल्याच्या तक्रारी सध्या वाढत आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दुरुस्तीची अंतिम संधी उपलब्ध आहे.
शासकीय यंत्रणेचा निधी खर्चाचा वेग
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम, महसूल, जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिका विभागांत प्रलंबित कामांना गती मिळाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत १५ ते २० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या महासंग्रामाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येत्या काही तासांत निवडणूक रणशिंग फुंकले जाणार हे निश्चित.


