
मुंबई प्रतिनिधी
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने राज्यातील वैद्यकीय व्यवस्थेत खळबळ उडाली असून या घटनेची निष्पक्ष चौकशी आणि आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज राज्यभरातील डॉक्टर संघटना आक्रमक झाल्या आहेत. आंदोलनामुळे अनेक शासकीय आणि पालिका रुग्णालयांतील नियमित सेवा विस्कळीत झाल्या असून अत्यावश्यक सेवांशिवाय इतर सर्व विभागांमध्ये कामकाज ठप्प झाले आहे.
फलटण येथील डॉक्टर तरुणीने २३ ऑक्टोबर रोजी स्थानिक हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिने मृत्युपूर्वी तळहातावर लिहिलेल्या नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदणे आणि प्रशांत बनकर यांच्यावर शारीरिक व मानसिक छळाचे गंभीर आरोप केले होते. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणात पोलिस तसेच एका माजी खासदाराकडून वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी मार्डसह विविध संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. मुंबईतील नायर रुग्णालयात डॉक्टरांनी ‘नो सेफ्टी, नो सर्विस’, ‘बेटी पढ़ी, पर बची नहीं’ अशा घोषणा देत निदर्शने केली. बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवत पोस्टग्रॅज्युएट डॉक्टर आणि निवासी डॉक्टरांनी निदर्शनात सहभाग घेतला आहे.
आंदोलनकर्त्यांनी मृत डॉक्टरच्या कुटुंबास पाच कोटींची मदत, विशेष न्यायालयात जलद सुनावणी आणि डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी करण्याच्या मागण्या पुढे केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयासह राज्यातील अनेक वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये ओपीडी सेवा बंद राहिल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
डॉक्टर तरुणीच्या मृत्यूनंतर राज्यात संताप उसळला असून वैद्यकीय व्यावसायिक सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सरकारने या प्रकरणाची दखल घेत त्वरीत व ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा डॉक्टर संघटनांनी दिला आहे.


