
मुंबई प्रतिनिधी
मविआच्या ‘सत्याचा मोर्चा’नंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना, या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपने आज पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीका चढवली. मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचाच व्हिडिओ दाखवत मविआवर पलटवार केला.
“आयोगाच्या बाजूनं आम्ही बोलत नाही. पण दुबार मतदारांवर बोलताना तुष्टीकरण केलं जातंय,” असे शेलार म्हणाले. “तुम्हाला दुबार मतदार फक्त हिंदू आणि दलितांमध्ये दिसतात, मुस्लिम मतदार दिसत नाहीत का? अशी निवडक भूमिका का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांच्या शैलीतच ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत शेलार यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. “मविआला हिंदू आणि मराठी मतदारच दुबार का दिसतात? मुस्लिम दुबार मतदार दिसले तर मौन का?” असा हल्लाबोल त्यांनी केला.
निवडणूक आयोगावर टीका करून मतदारयादीतील घोळाचा मुद्दा पुढे करणाऱ्या मविआवर शेलार म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी निवडणूक यंत्रणेवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे. मुस्लिम दुबार मतदारांच्या सहाय्यानं निवडणूक जिंकण्याचं षडयंत्र आहे.”
कर्जत-जामखेड आणि इस्लामपूर मतदारसंघातील उदाहरणे देत शेलार म्हणाले, “हिंदू-दलित मतदार दुबार असतील तर गदारोळ; पण मुस्लिम मतदारांचे नाव आलं की शांतता! हा दुहेरी निकष का?” तसेच “विचारवापसी करा,” असे आवाहनही त्यांनी ठाकरे बंधूंना केले.
दरम्यान, मविआच्या मोर्चानंतर राजकीय वाद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीतील ‘दुबार नोंदी’चा मुद्दा तापण्याची शक्यता वाढली आहे.


