
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील मतदार याद्यांतील गोंधळ, बोगस नावे आणि संशयास्पद नोंदींच्या विरोधात महाविकास आघाडी व मनसेचा ‘सत्याचा मोर्चा’ आज पार पडला. राज ठाकरे यांच्यानंतर व्यासपीठावर आलेल्या शिवसेना (उद्धव) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह भाजप नेत्यांवर थेट लक्ष्य साधत वातावरण तापवले.

“दोन दिवसांपूर्वी मी मातोश्रीत बसलो होतो. सांगण्यात आलं की निवडणूक आयोगाचे अधिकारी आलेत. दिवाळी-दसरा ओलांडून साधू-संत घरी येतात, तसं हे आले. सर्व मराठी अधिकारी… त्यांचा दोष नाही. पण प्रश्न आहे, त्यांना आता का आठवलं? आदेश कोणाचा?” असा टोला ठाकरे यांनी लगावला.
“ही केवळ विरोधी पक्षांची एकजूट नाही; ही लोकशाही वाचवण्याची एकजूट आहे.”
मतदार याद्यांतील फेरफार प्रकरणावरून त्यांनी सरकारला आणि आयोगाला कठोर इशारा दिला. “आज ज्या ठिणगीची तुम्ही थट्टा करता, ती उद्या वणवा बनेल. जनतेची आग लागली तर काहीच थांबणार नाही,” असा इशारा उद्धवांनी दिला.
‘शोले’ ते ‘अॅनाकोंडा’: उद्धवांचा तिखट हल्ला’
भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी ‘शोले’मधील संवादाचा आधार घेतला.
“पूर्वी मुलं रडली की आई म्हणायची गब्बर येईल. आता मी सांगतो जागे राहा, नाहीतर अॅनाकोंडा येईल. हा अॅनाकोंडा म्हणजे ही सत्ताधारी यंत्रणा. आता त्याला बांधून ठेवावंच लागेल,” असा उपरोधिक इशारा त्यांनी दिला.
मतदारसंघातील कथित अनियमिततांवरून त्यांनी सरकारला खुले आव्हान दिले.
“मुख्यमंत्र्यांनीही मतं चोरी मान्य केली आहेत. मग पर्दाफाश करा. दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या,” असं ते म्हणाले.
‘मतदारांची चाचपणी करा’ जनतेला आवाहन
राज्यभरातील नागरिकांनी स्वतःच्या मतदार नावाची पडताळणी करावी, असे आवाहनही ठाकऱ्यांनी केले.
“तुमच्या घराची परवानगी न घेता कोणी शिरलं, तर तुम्ही बसून बघणार का? मतदारयादीतही तेच आहे,” असे ते म्हणाले.
‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अर्जदारच बनला संशयित
मतदार यादीतील एका विचित्र घटनेचा उल्लेख करत त्यांनी उघड केले की त्यांच्या नावानेच एका जागेवर खोटी ऑनलाइन पडताळणी करण्यात आली होती.
“अर्ज माझ्या नावाने, पण मला माहितही नाही! मोबाईल नंबर खोटा. हा अर्जदार शोधणार कुठे? नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे!” असा धक्कादायक दावा त्यांनी केला.
राज्यातील वातावरण तापले
सत्याचा मोर्चा हे राजकारणापुरते नसून लोकशाहीच्या तारणासाठी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. “आज महाराष्ट्र उभा आहे. देशाला वाट दाखवण्यासाठी,” असे ते शेवटी म्हणाले.


