मुंबई प्रतिनिधी
राज्यात मतदार याद्यांतील गोंधळावरून तापलेलं राजकीय वातावरण आज आणखी तापलं. विरोधकांनी मुंबईत काढलेल्या ‘सत्याचा मोर्चा’त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पुरावे सादर करत दुबार मतदारांचा मुद्दा उचलला आणि सभागृहात क्षणातच खळबळ उडाली.

दक्षिण मुंबईतील फॅशन स्ट्रीट येथून महापालिका मुख्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचे दिग्गज नेते सहभागी झाले.
मोर्चाच्या आरंभी भाषण करताना राज ठाकरे यांनी मतदार याद्यांतील घोळावर थेट आरोपांचा भडिमार करत लाखो मतदार दुबार नोंदवले गेल्याचा दावा केला.
“४५०० मतदारांनी दोन ठिकाणी मतदान”
“कल्याण, डोंबिवली, मुरबाड व भिवंडीतील साडेचार हजार मतदारांनी मुंबईच्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघातही मतदान केले,” असा दावा करत राज ठाकरे यांनी तीन मतदारांची नावांसह उदाहरणं सभेत वाचून दाखवली.
“ही छोटी गोष्ट नाही. पारदर्शक निवडणूक हवी असेल तर मतदार याद्या शुद्ध कराव्या लागतील,” असं ठाकरेंनी ठामपणे सांगितलं.
मुंबईसह राज्यातील आकडे समोर
राज ठाकरेंनी जुलैपर्यंतच्या मतदार यादीचा दाखला देत लोकसभा मतदारसंघानुसार दुबार मतदारांची संख्या वाचून दाखवली.
काही ठळक आकडे :
मतदारसंघ दुबार मतदार
मुंबई उत्तर 62,370
मुंबई उत्तर-पश्चिम 60,231
मुंबई ईशान्य 92,983
मुंबई उत्तर-मध्य 63,743
मुंबई दक्षिण-मध्य 50,565
मुंबई दक्षिण 55,205
नाशिक 99,673
मावळ 1,45,636
पुणे 1,02,002
ठाणे 2,09,981
“हे फक्त काही आकडे. यादी माझ्याकडे आहे आणि हे पुरावे मी आज तुमच्यासमोर दाखवतोय,” असं ते म्हणाले.
“तर मग घाई कसली?”
“भाजप, शिंदे गट, अजित पवार गट सगळे दुबार मतदारांबद्दल बोलतात. मग अडवलं कोण? आधी मतदार याद्या स्वच्छ करा. निवडणूक एक वर्ष उशिरा झाली तर काय कोसळणार आहे?” असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.
“नवी मुंबईतील आयुक्तांच्या निवासस्थानी मतदार नोंदवले जातात, कुणी सुलभ शौचालयात मतदार नोंदवतात. हे लोकशाहीला लाज आणणारं आहे,” अशा शब्दांत ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली.
‘राजकीय वातावरण भारलेले’
या मोर्चामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये पुन्हा एकदा रंगत आली असून आगामी स्थानिक निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मतदार याद्या शुद्धीकरणाचा मुद्दा आता राज्यात केंद्रबिंदू बनला असून यावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया काय राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


