
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. नगरपालिकांच्या प्रभाग आरक्षणासह नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले असून मतदार यादीही अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात राज्यातील २८९ नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्याच निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी होण्याची शक्यता असून त्याच दिवशी निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम मुदतीनुसार राज्यातील मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी पार पाडायच्या आहेत. यामध्ये २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषद, ३३१ पंचायत समित्या आणि २९ महापालिकांचा समावेश आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून महापालिकांच्या प्रभाग व महापौर आरक्षणाचा निर्णयही याच महिन्यात होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन टप्प्यातील निवडणुका सुमारे ८५ दिवसांत होणार असून पहिल्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम २१ ते २५ दिवसांचा असेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्या तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
राज्यातील सुमारे नऊ कोटी मतदार या निवडणुकांत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
संभाव्य टप्पे
* २८९ नगरपालिका – २१ दिवसांचा कार्यक्रम
* ३२ जिल्हा परिषद व ३३१ पंचायत समित्या – ३० ते ३५ दिवसांचा कार्यक्रम
* २९ महापालिका – २५ ते ३० दिवसांचा कार्यक्रम
तीन महिने आचारसंहितेची छाया?
निवडणूक कार्यक्रम तीन टप्प्यांत राबविण्यात येणार असल्याने नोव्हेंबरपासून जानेवारीअखेरपर्यंत जवळपास तीन महिने आचारसंहिता लागू राहण्याची शक्यता आहे. सुट्ट्या गृहित धरल्यास प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया ८६ ते ८७ दिवसांत पूर्ण करावी लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घ काळांनतर होणार असल्याने राज्याच्या प्रशासकीय व राजकीय वर्तुळात याबाबत उत्सुकता वाढली आहे.


