मुंबई प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा तांडा आता सुरू होण्याची चिन्हे अधिक ठळक झाली आहेत. राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा करणार असून त्यानंतर राज्यात आचारसंहिताही लागू होणार आहे. पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या घोषणेनंतर तीन आठवड्यांच्या आतच मतदानाची प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तातडीने जाहीर होणार आहेत. अतिवृष्टी, पुरपरिस्थिती आणि अद्याप ग्रामीण भागात सुरू असलेल्या मदतकारभाराच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. अखेरच्या टप्प्यात २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडणार असून जानेवारी २०२६ च्या १५ ते २० दरम्यान मतदानाची तयारी आयोगाने पूर्ण केल्याची माहिती मिळते.
न्यायालयाच्या निर्देशांनुसार ३१ जानेवारीपूर्वी सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याने आयोगाकडून जलद गतीने टप्प्यानुसार निवडणूक कार्यक्रम आखण्यात आला आहे. नगरपालिका आणि नगर पंचायती नोव्हेंबरमध्ये, जिल्हा परिषद-पंचायत समित्या डिसेंबरमध्ये आणि महापालिका निवडणुका जानेवारीत, ‘अशा तीन टप्प्यांत हा महत्त्वपूर्ण निवडणूक प्रवास पार पडणार आहे.
मतमोजणीसाठीही नवीन धोरण अवलंबले जात असून प्रत्येक टप्प्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. तिन्ही टप्प्यांची एकत्र मतमोजणी न करता टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. मर्यादित मनुष्यबळ आणि मोठ्या प्रमाणावरील निवडणुकांचा ताण लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
मतदारयादीतील त्रुटींवरून वाद
मतदारयाद्यांतील त्रुटींमुळे निवडणुका पुढे ढकलाव्या, अशी मनसे आणि महाविकास आघाडीची मागणी होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियोजित वेळेतच निवडणुका होणार असून निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रश्नच नाही, असे आयोगाने ठामपणे सांगितले आहे.
ईव्हीएमची मोठी खरेदी
मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आयोगाने ईव्हीएमचा पुरवठा सुनिश्चित केला आहे. मध्य प्रदेश सरकारकडून यंत्रांचा पुरवठा निश्चित करण्यात आला असून इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ५० हजार ईव्हीएम खरेदी करण्यात आली आहेत. तसेच केंद्र निवडणूक आयोगाकडूनही यंत्रांची मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हा मोठा राजकीय पर्व सुरू होताच राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पक्षांची रणनिती, उमेदवारी, महापालिका लढती आणि कोकण-विदर्भ ते मराठवाडा पर्यंतचा सत्तासमीकरणांचा खेळ, ‘पुढील काही महिने महाराष्ट्राचे राजकीय तापमान कायम उच्चांकी राहणार यात शंका नाही


