मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर जीवदानासाठी झटणाऱ्या डॉक्टरांवरच प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रुग्णालयातीलच एका महिला सहकर्मीसोबत प्रेमसंबंध असल्याचा राग मनात धरून तरुणीच्या भावाने आणि त्याच्या साथीदारांनी एका तरुण डॉक्टरवर चाकू हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली असून सुरक्षिततेच्या प्रश्नांवर नवी चर्चा सुरू झाली आहे.
26 वर्षीय डॉ. विशाल यादव हे रशियातून एमबीबीएस पूर्ण करून केईएम रुग्णालयातील सीव्हीटीएस विभागात हाऊस ऑफिसर म्हणून दोन महिन्यांपूर्वी रुजू झाले. त्याच विभागात परफ्यूजनिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या एका मुस्लिम तरुणीसोबत त्यांची मैत्री झाली आणि पुढे त्याचे प्रेमसंबंधांत रुपांतर झाले. या नात्याची माहिती दोन्ही कुटुंबीयांपासून लपवून ठेवण्यात आली होती. परंतु मुलीच्या बहिणीला या नात्याबाबत समजताच कुटुंबाने विरोध दर्शवला.
घटनेच्या दिवशी म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी सकाळी वॉर्ड क्रमांक 31 मध्ये काम सुरू असताना मुलीचा भाऊ फरीद, त्याचा मित्र नबील आणि एक अज्ञात व्यक्ती रुग्णालयात आले. त्यांनी डॉक्टरांना बाहेर बोलावून शिवडीला जाण्याचा आग्रह धरला. “प्रथम मला तुमच्या बहिणीशी बोलू द्या,” असे डॉक्टर यादव यांनी सांगितले असल्याचे समजते. मात्र आरोपींनी त्यांचे म्हणणे न ऐकता त्यांना परळ बसस्टॉपजवळील हनुमान मंदिराजवळ नेले.
तिथे वाद वाढताच आरोपींनी डॉक्टरांना शिवीगाळ केली आणि झटापट सुरू झाली. त्याचदरम्यान फरीदने खिशातून चाकू काढत डॉ. यादव यांच्या पाठीवर आणि डाव्या हातावर वार केले. “आज तुला जिवंत सोडणार नाही,” असे म्हणत आरोपींनी धमकी दिली, अशी माहिती फिर्यादीत नमूद आहे. उपस्थित नागरिकांनी हस्तक्षेपाचा प्रयत्न केला असता त्यांनाही धमक्या देण्यात आल्या.
जखमी अवस्थेत डॉ. यादव यांना तातडीने रुग्णालयात उपचार देण्यात आले. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी फरीद खान, नबील आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
या घटनेनंतर डॉक्टर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून रुग्णालय प्रशासनाकडून अतिरिक्त सुरक्षा उपाययोजनांची मागणी होत आहे. शहरात अलिकडच्या काळात वाढलेल्या हिंसात्मक घटनांनी कायदा,सुव्यवस्थेचे प्रश्न पुन्हा चिंतेत टाकणारे ठरले आहेत.


