मुंबई प्रतिनिधी
मुंबईत घडलेल्या पवईतील ओलीस प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. ऑडिशनच्या नावाखाली स्टुडिओत नेऊन तब्बल 17 शाळकरी मुलांसह 19 जणांना ओलीस ठेवणारा आरोपी रोहित आर्या अखेर कमांडो कारवाईत ठार झाला. मात्र या काळोख्या कटाची वस्तुस्थिती, तेथील धडधड वाढवणारे क्षण आणि रोहितची मानसिकता कशी होती, याची भीतीदायक झलक कोल्हापूर येथील मंगल पाटनकर या आजींनी दिलेल्या कथनातून समोर आली आहे. त्या स्वतः आपल्या नातीसह या घटनेच्या वेळी स्टुडिओत उपस्थित होत्या.
‘शूटिंग’चं आमिष, आणि कुलूपबंद अंधार
काही दिवसांपूर्वी ऑडिशन घेतल्यानंतर रोहितने मुलांना दोन दिवसांनी शूटिंग होईल असे सांगितले. सुरुवातीला तो प्रेमळ, काळजी घेणारा भासवत होता. मुलांना खाण्यापिण्याची सोय, बोलण्यातील गोडवा, ‘सर्व सामान्य वाटत होतं. मात्र बुधवारी अचानक त्याचा मुखवटा उतरला.
मंगल पाटनकर सांगतात,
“सर्व मुलांना एका खोलीत घेऊन जा, तुम्ही बाहेर थांबा” असं सांगून रोहितने पालकांवर गेट बंद केलं आणि मोठं कुलूप लावलं. नंतर काही मुलांना वरच्या मजल्यावर नेलं. इथून खरी दहशत सुरू झाली.
‘श्रीमंत–गरीब असा गटविभाग’
या घटनाक्रमातील सर्वात अंगावर काटा आणणारा तपशील म्हणजे मुलांचे वर्गीकरण.
“चार दिवसांत त्याने कोण घरचं श्रीमंत, कोण साधारण घरचं हे शोधून काढलं. श्रीमंत मुलांना वेगळ्या खोलीत ठेवण्यात आलं,” असं पाटनकर सांगतात.
यातूनच पोलिसांचा संशय अधिक बळावतो, हा कट एकट्याचा नसावा.
स्टुडिओतील सीसीटीव्ही कॅमेरे काढून लाइट्स बसवणे, शटरला दोन मोठी कुलुपं, खिडक्यांवर सेन्सर्स… हे सर्व पूर्वनियोजित आणि अभ्यासपूर्वक केल्याचं दिसतं.
‘बंदूक दाखवत, आजींनाच ‘गार्ड’ बनवलं’
रोहितकडे बंदूक होती. तो मुलांना जवळ नेऊन दाखवत होता.
“आजी, तुम्ही मुलं सांभाळा. कुणी बाहेर गेलं तर…” असा आदेशच त्याने आजींना दिला.
त्यावेळी पालक ओरडत होते, विनंती करत होते, पण रोहित मात्र आत्मविश्वासाने हसत होता.
‘काळी दाढी, एक महिला, आणि ‘देशमुख’…
या प्रकरणात रोहितसोबत सहकारी असल्याचा संशय वाढतो, कारण आजींनी आणखी काही व्यक्तींचे उल्लेख केले, ‘काळी दाढी असलेला जाड पुरुष, प्रियंका नावाची महिला जी फोनवरून हसत बोलत होती, आणि नांदेडमधील देशमुख नावाचा व्यक्ती.
हा सर्व ‘शूटिंग टीम’चा भाग होता का? की त्याहून काही मोठा कट?
पोलिस तपासात उत्तरं मिळतील.
‘कमांडो कारवाई, आणि सुटका’
गुरुवारी दुपारी 1.45 वाजता पोलिसांना माहिती मिळाली. तातडीने कमांडो, बॉम्ब स्क्वॉड, आणि ATS पथक दाखल झालं.
मुलांचा आवाज, आतला तणाव, आणि बाहेरचा धाक–धमक्या यांच्यामध्ये ऑपरेशन पार पडलं आणि मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. रोहितला छातीत गोळी लागून तो मृत झाला.
“आजींच्या डोळ्यांतून अश्रू दाटले ”
“वाचवले आमचं बाळं. देवाचं आणि पोलिसांचं उपकार.”
काही प्रश्न अद्याप अनुत्तरित
” मुलांची निवड कशासाठी?
* आर्थिक मागणी होणार होती का?
* त्याची ‘टीम’ नेमकी कोण?
* स्टुडिओचं निरीक्षण चार दिवस का?
या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असून, उर्वरित आरोपींचा शोध तीव्र गतीने घेतला जात आहे.
मुंबईच्या या हृदयाला चिरून टाकणाऱ्या घटनेने पालकांच्या मनात नवी भीती निर्माण केली आहे. आजही अनेक जण ‘ग्लॅमर’ आणि ‘शूटिंग’च्या मोहात अशा ऑडिशन केंद्रांकडे धाव घेतात. या घटनेने मोठा इशारा दिला आहे. स्वप्नांची नगरी आहे, पण सावधानीची गरजही तेवढीच आहे.


