नागपूर प्रतिनिधी
वडिलांचा अचानक मृत्यू, प्रकृती अस्थिर, आयसीयूमधून उपचार… अशा कठीण संघर्षातून जात असताना एका तरुणीने स्वप्नाला तडा जाऊ दिला नाही. अपार मानसिक ताण आणि नैराश्याशी झुंज देत प्रगती जगताप हिने राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळविले आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २७ ते २९ मेदरम्यान झाली. त्यानंतर पात्र ठरलेल्या १,५१६ उमेदवारांच्या मुलाखती ३० ऑक्टोबरपर्यंत पार पडल्या. रात्री उशिरा जाहीर झालेल्या निकालात प्रगतीने मानाची बाजी मारली.
‘वडिलांच्या जाण्यानंतर मानसिक संघर्ष’
प्रगतीचे वडील सुनील जगताप हे अकोला महापालिकेत वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक होते. ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांचे आकस्मिक निधन झाले. ही बातमी प्रगतीसाठी भावनिक धक्का होता. डिसेंबरमध्ये होणारी पूर्व परीक्षा दारात उभी असताना तिचा अभ्यासावरून लक्ष हटले, नैराश्याचा विळखा घट्ट होत गेला. त्यातच अचानक प्रकृती बिघडून उपचारांसाठी आयसीयूमध्ये दाखल व्हावे लागले.
या काळाबद्दल प्रगती म्हणते, “ते दिवस अत्यंत कठीण होते. आजारपण आणि बाबांचे जाणे… मन तुटले होते. मित्रांनी, कुटुंबीयांनी साथ दिली, त्यांच्यामुळे पुन्हा मार्गावर आले.”
‘नोकरी सोडून पूर्णवेळ तयारी’
२०१८ ते २०२२ दरम्यान प्रगती कृषीसेवक म्हणून कार्यरत होती. केंद्र सरकारी प्रशासनात जाण्याचे लक्ष्य मनाशी बाळगत तिने नोकरीचा राजीनामा देत अभ्यासाला सुरुवात केली. २०२३ मध्ये ती उपविभागीय अधिकारीपदासाठी निवडली गेली होती. मात्र ती सध्या कळमेश्वर येथे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून काम पाहत आहे.
कठोर अभ्यास, वेळेचे नियोजन, संकटांवर मात आणि ध्येयाप्रती अचल निष्ठा याच्या जोरावर तिने राज्यसेवेत शीर्ष स्थान मिळवले.
‘यश, पण बाबांची हुरहूर’
“आज आनंदाचा क्षण आहे, पण बाबा सोबत असते तर… हे यश मी माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रांना समर्पित करते,” असे भावूक शब्द प्रगतीने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
‘यूपीएससीचे स्वप्न कायम’
राज्यसेवा परीक्षेचे यश गाठल्यानंतरही तिची नजर यूपीएससीवर आहे. “लक्ष्य केंद्रीय लोकसेवा आयोग. राज्यसेवा झाली, पण यूपीएससीचा अभ्यास सुरूच ठेवणार,” असेही तिने सांगितले.
आता प्रगतीला मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे.
आव्हानांना सामोरे जात, दु:खाच्या गर्तेतून मार्ग काढत आणि स्वप्नांवर ठाम राहून साधलेला हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी म्हणावा लागेल. प्रगती जगताप ही केवळ गुणांनी पहिली आलेली उमेदवार नाही; तर चिकाटी, ध्येयवेड आणि जिद्दीचे जिवंत उदाहरण आहे.


