 
                नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४चा अंतिम निकाल जाहीर केला असून सोलापूरचा विजय नागनाथ लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर दुसरा क्रमांक हिमालय घोरपडे यांनी मिळवला आहे. मुख्य परीक्षेनंतर घेण्यात आलेल्या मुलाखतीची प्रक्रिया ३० ऑक्टोबरला पूर्ण झाली असून रात्री उशिरा अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.
विजय लमकणे हे यापूर्वीही एमपीएससीच्या विविध सेवांसाठी निवड झाले असून सध्या ते गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकात सर्वसाधारण गुणवत्ता यादीसह पात्रतागुणांची माहितीही देण्यात आली आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २७ ते २९ मे दरम्यान झाली होती. एकूण ७९७० उमेदवारांपैकी ७७३२ उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर केला होता. त्यापैकी १,५१६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. मुलाखतीनंतर १,४०९ उमेदवारांचा अंतिम निवडीत समावेश झाला आहे. निकाल हा न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
‘कट ऑफमध्ये ऐतिहासिक वाढ’
यंदाच्या परीक्षेत विक्रमी कट ऑफ लागल्याने उमेदवारांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ ५०७.५०, अनुसूचित जातीचा ४४७ तर अनुसूचित जमातीचा ४१५ इतका जाहीर करण्यात आला आहे. हे आतापर्यंतचे सर्वाधिक गुण असून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे आव्हान या निकालातून दिसले.
‘तांत्रिक अडचणी आणि पुढे ढकलण्याची मागणी’
मुख्य परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याची तक्रार काही उमेदवारांनी केली होती. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र प्रणाली सामान्य स्थितीत आल्यानंतर आयोगाने उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याची अतिरिक्त संधी दिली होती.
राज्यसेवा परीक्षेचं निकाल जाहीर होताच यशस्वी उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण असून पुढील नियुक्ती प्रक्रियेबाबत उमेदवार आता उत्सुक आहेत. महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेत नवीन अधिकारीवर्ग दाखल होण्याचा हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

 
 
 

