मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील पवई परिसरात रविवारी मुलांना ऑडिशनच्या नावाखाली बोलावून त्यांना ओलीस ठेवण्याचा धक्कादायक प्रकार घडला. एका १५ वर्षांखालील मुला-मुलींना गेल्या काही दिवसांपासून ‘टीव्ही मालिकेत काम मिळेल’ या बहाण्याने स्टुडिओमध्ये बोलावले जात होते. अखेर रविवारी या सर्व मुलांना खोलीत बंद करून आरोपी रोहित आर्यने बंदूक दाखवत दहशत माजवली. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. कारवाईदरम्यान आरोपीवर गोळीबार करण्यात आला असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
‘ऑडिशनसाठी बोलावून मुलांना बंदी’
पवईतील महावीर क्लासिक इमारतीतील RA स्टुडिओमध्ये गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुलांचे ऑडिशन घेत असल्याची माहिती पालकांना देण्यात आली होती. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेसाठी प्रतिभावान मुलांना निवडले जात असल्याचे सांगण्यात आले होते.
कोल्हापूरसह विविध जिल्ह्यांतून आलेली मुलं येथे प्रशिक्षण आणि ऑडिशनसाठी येत होती. रविवार सकाळी मुलांचे अंतिम टप्प्यातील ऑडिशन घेतल्याचा दावा आरोपीने केला. त्यानंतर मुलांना पिझ्झा, कोल्ड्रिंक्ससह इतर खाद्यपदार्थ देत त्याने त्यांचा विश्वास संपादन केला.
‘बंदूक दाखवत धमक्या’
खाद्यपदार्थ घेतल्यानंतर अचानक आरोपीने दार बंद केले व बंदूक काढली. मुलांच्या डोक्यावर बंदूक ठेवत
“कोणी आवाज केला तर गोळी घालीन”
अशी धमकी त्याने दिली. यानंतर आत असलेल्या सुमारे १७ मुलांबरोबर दोन प्रौढही घाबरून गेले. मुलांनी काचेतून हात दाखवत मदतीचे संकेत दिले, तेव्हा पालकांना संशय आला आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.
‘कमांडो-स्टाईल कारवाई; बाथरूममधून एन्ट्री’
घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांसह NSG-प्रशिक्षित जवान घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती पाहता पोलिसांनी स्टुडिओच्या बाथरूममधून आत प्रवेश करत अत्यंत कौशल्याने मुलांना सुरक्षित बाहेर काढले.
या वेळी आरोपीने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी एक राउंड फायर करत त्याला निष्क्रिय केले. रोहित आर्य याच्या छातीला गोळी लागली व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
काय चालले होते प्रत्यक्षात?
प्राथमिक तपासानुसार आरोपीने स्टुडिओ भाड्याने घेतला होता व स्वतःला कास्टिंग डायरेक्टर म्हणून सादर केले होते. सोशल मीडियावर जाहिरात करून मुलांना बोलावले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मुलांना ओलीस ठेवून हल्ला करण्याचा किंवा मोठी खंडणी मागण्याचा त्याचा प्लॅन होता का, याबाबत तपास सुरू आहे.
‘पोलिसांनी टाळला मोठा अनर्थ’
संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तातडीने प्रतिसाद देत १९ जणांचे प्राण वाचवले.
१७ मुले,
१ पालक ,
१ स्थानिक कर्मचारी,
सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
दिवाळी सुट्टीचा काळ, पालक अधिक सावध राहण्याचे आवाहन
सध्या शाळांना दिवाळी सुट्ट्या असल्याने अनेक पालक मुलांना विविध कोर्सेस, वर्कशॉप्स, अॅक्टिंग क्लासेससाठी पाठवत आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाने पालकांना धक्का बसला आहे.
पोलिसांनी पालकांना केलं आवाहन
अपरिचित ऑडिशनवर विश्वास ठेवू नये
स्टुडिओ/कास्टिंग एजन्सीची चौकशी करावी
लहान मुलांना एकटे पाठवू नये
असे आवाहन केले आहे.
पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीची पार्श्वभूमी, हेतू, सोशल मीडिया नेटवर्क आणि संभाव्य साथीदार याबाबत तपास सुरू आहे.


